Thu, Mar 21, 2019 14:57होमपेज › Mumbai-Thane-Raigad › नवी मुंबईतील तंत्रज्ञही अडकला होता एमआरआयमध्ये

नवी मुंबईतील तंत्रज्ञही अडकला होता एमआरआयमध्ये

Published On: Jan 31 2018 2:05AM | Last Updated: Jan 31 2018 1:29AMमुंबई : पुढारी वृत्तसेवा

नायर हॉस्पिटलमधील एमआरआय मशीनमध्ये एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. असाच प्रसंग टाटा मेमोरिअल हॉस्पिटल नवी मुंबईतील शाखेच्या स्वामी रामय्या या तंत्रज्ञावर 2014 साली गुदरला होता. केवळ दैव बलवत्तर म्हणून रामय्या बचावला. तो प्रसंग आठवला की आजही अंगावर काटा येतो, असे तो सांगतो. 

रामय्या टाटा मेमोरिअल हॉस्पिटल परळच्या नवी मुंबई शाखेतील अ‍ॅडव्हान्स सेंटर फॉर ट्रीटमेंट, रिसर्च अँड एज्युकेशन इन कॅन्सर  विभागात तंत्रज्ञ म्हणून कार्यरत आहे. 8 नोव्हेंबर 2014 रोजी तो तेथील एमआरआय मशीनमध्ये चार तास अडकला. डॉक्टर आणि वॉर्डबॉय यांच्यातील गैरसमजामुळे हा प्रकार घडला होता. डॉक्टरने वॉर्डबॉयला ऑक्सिजन मास्क आणण्यास सांगितले होते. मात्र वॉर्डबॉय सिलिंडर घेऊन आला. त्यामुळे रामय्या मशीनमध्ये ओढला गेला. तो वॉर्ड बॉय आणि मशीन यांच्यामध्ये अडकला. चार तासांच्या अथक प्रयत्नांनंतर त्याची सुटका झाली. 

कमरेखालच्या भागावर प्रचंड दबाव आल्यामुळे त्याला अर्धांगवायूचा झटका आला. या घटनेमुळे त्याला प्रचंड मानसिक धक्‍काही बसला होता. रामय्याचे सध्या मानसिक समुपदेशन करण्यात येत आहे. उपचारानंतर त्याच्या शरीराच्या कमरेखालच्या भागात सुधारणा झाली आहे. फेब्रुवारी 2016 मध्ये तो पुन्हा रुग्णालयाच्या एमआरआय विभागात दाखल झाला आहे. धातूची कोणतीही वस्तू चुकूनही एमआरआय कक्षात जाऊ नये, याची खबरदारी तो घेत असतो. मशीन उत्पादक कंपनीने त्याला 1 कोटी रुपयांची भरपाई देऊ केली होती.