मुंबई: प्रतिनिधी
हिंदूना सन्मान आणि अधिकार मिळवून देण्यासाठी, हिंदू राष्ट्र स्थापनेसाठी आणि देशभरात हिंदू राष्ट्रांना संकल्पनाची पुढील दिशा ठरविण्यासाठी हिंदू जनजागृती समितीच्यावतीने गोव्यात 4 ते 7 जूनपर्यंत श्री रामनाथ देवस्थान, फोंडा, गोवा येथे सप्तम अखिल भारतीय हिंदू अधिवेशन आयोजित करण्यात आल्याची माहिती हिंदू जनजागृती समितीचे प्रवक्ता सतीश कोचरेकर यांनी मुंबई मराठी पत्रकार संघात दिली. यावेळी पत्रकार परिषदेला लष्कर ए हिंदचे राष्ट्रीय अध्यक्ष ईश्वरप्रसाद खंडेलवाल यांची उपस्थित होती.
यावेळी कोचरेकर म्हणाले, या अधिवेशनाला भारतातील 19 राज्यासह नेपाळ, श्रीलंका आणि बांगलादेश येथील सुमारे 180 हून अधिक हिंदू संघटनांचे 650 प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. अधिवेशनात प्रामुख्याने हिंदूचे रक्षण, मंदिर रक्षण, संस्कृती, इतिहास, धर्मांतर, लव्ह जिहाद, काश्मिरी हिंदूचे पुनर्वसन आदीं समस्यासह युवा संघटन, संत संघटन आणि हिंदू राष्ट्राची स्थापना याविषयी प्रत्यक्ष कृती कार्यक्रम निश्चित करण्यात येणार आहेत. यासह पाकिस्तान, बांगलादेश, नेपाळ आणि श्रीलंका येथील हिंदूचे रक्षण आणि त्यांना साहाय्य करण्यासाठी कोणत्या माध्यमातून प्रयत्न करावेत, याचीही चर्चा होणार असल्याचे ते म्हणाले.
केंद्रातील तसेच देशातील बहूुतांश राज्यात हिंदुत्वनिष्ठ विचारांचा पक्ष असलेल्या भाजपाची सत्ता आहे. मात्र हिंदुच्या महत्त्वाच्या विषयांवर सरकारने कोणतीही ठोस भूमिका घेतली नसल्याचे ईश्वरप्रसाद खंडेलवाल यांनी सांगितले.