होमपेज › Mumbai-Thane-Raigad › शिर्डी  विमानतळ येथे नाईट लॅंडींगची सुविधा तातडीने सुरू करा : मुख्यमंत्री

शिर्डी  विमानतळ येथे नाईट लॅंडींगची सुविधा तातडीने सुरू करा : मुख्यमंत्री

Published On: Aug 10 2018 3:06PM | Last Updated: Aug 10 2018 3:06PMमुंबई : प्रतिनिधी

शिर्डी येथे सुरू करण्यात आलेल्या विमानसेवेला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या ठिकाणी येणाऱ्या भाविकांची व प्रवाशांची वाढती संख्या विचारात घेऊन शिर्डी विमानतळ येथे नाईट लँडींगची सुविधा तातडीने कशी सुरू करता येईल. यादृष्टीने विमानतळ विकास कामास गती द्या, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत राज्यातील विमानतळांच्या विकासकामांचा आढावा घेण्यात आला. 
हरीतक्षेत्र असलेल्या शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या शुभारंभानंतर आतापर्यंत सुमारे पन्‍नास हजार प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या 2 हजार विमानांच्या फेऱ्या झाल्या आहेत. या विमानतळाच्या टर्मिनल इमारतीच्या रेखांकनासाठी सल्लागाराची नेमणूक करण्याच्या मागणीस बैठकीत मान्यता देण्यात आली. 

साईबाबा महासमाधी शताब्दी सोहळ्यासाठी होणारी गर्दी पाहता शिर्डी विमातळाच्या धावपट्टीचे विस्तारीकरण करण्यात येणार असून सध्याची अडीच हजार मीटर लांबीची धावपट्टी तीन हजार दोनशे मीटर करण्यात येणार आहे. या कामास गती देण्यात यावी, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या.

पुरंदर, बेलोरा (अमरावती), चंद्रपूर, सोलापूर, शिवनी (अकोला), गोंदूर (धुळे) या विमानतळांच्या कामाचा आढावा घेतला. प्रादेशिक विमान सेवा जोडणी योजनेतील कामांचाही यावेळी आढावा घेण्यात आला. नांदेड, नाशिक, जळगाव, कोल्हापूर येथील विमानतळांना चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.