Mon, Jun 17, 2019 04:52होमपेज › Mumbai-Thane-Raigad › तोतया मुख्यमंत्र्याकडून आमदारकीचे आमिष

तोतया मुख्यमंत्र्याकडून आमदारकीचे आमिष

Published On: Mar 22 2018 1:43AM | Last Updated: Mar 22 2018 1:09AM ठाणे : खास प्रतिनिधी

मुख्यमंत्र्यांच्या नावाचा गैरवापर करून दहा कोटी रुपयांच्या मोबदल्यात महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्यत्व (एमएलसी) मिळवून देण्याचे आमिष दाखविणार्‍या टोळीला मंगळवारी एका भाजप नगरसेवकाच्या तक्रारीवरून 25 लाखांचा पहिला हप्ता घेताना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट - पाचने रंगेहाथ पकडले. या टोळीची मास्टर माईंड अनुद सज्जाद शिरगांवकर (29),अनिलकुमार शंकरलाल भानुशाली (31) या आरोपींना 26 मार्चपर्यंत पोलीस कोठडी मिळाली असून तोतया मुख्यमंत्री अब्दुल्ला फैय्याज अन्सारी याला देखील पोलिसांनी आज बेड्या ठोकल्या आहेत. 

ठाणे महापालिकेतील भाजपचे नगरसेवक मनोहर डुंबरे यांना एका कार्यकर्त्यांच्या मार्फत आरोपी अनुद शिरगांवकर रा. कल्याण यांच्याकडून दहा कोटी रुपयांच्या मोबदल्यात एमएलसी देण्याची ऑफर आली. मुख्यमंत्र्यांकडून बायोडाटा मंजूर केल्यावर 25 लाख द्यावे लागतील. वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांशी थेट भेट घालून दिली जाईल आणि शपथविधीपूर्वी पावणे पाच कोटी आणि शपथ विधीनंतर पाच कोटी रुपये द्यावे लागतील, अशी ऑफर देण्यात आली. त्यानंतर प्रत्यक्ष मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी डुंबरे यांनी संपर्क साधल्यानंतर हा ट्रॅप लावण्यात आला.

त्यानुसार एमएलसी बनण्याचा प्रवास सुरू झाला. 5 मार्चला आलेली ऑफर स्वीकारून डुंबरे यांनी 14 मार्च रोजी आरोपींशी बैठक निश्‍चित केली. बायोटाडा दिला. दुसर्‍या दिवशी आरोपीकडून फोन आला की तुमचा बायोडाटा मुख्यमंत्र्यांनी मंजूर केला आहे. भेटी वाढत गेल्या आणि आरोपी अनुद शिरगांवकर यांनी कॉन्फरन्समध्ये तोतया मुख्यमंत्र्यांशी संवाद साधून म्हणाल्या की,  सर, मनोह डुंबरे यांनी 25 लाखांची ऑफर मान्य केलेली आहे. त्यावर उत्तर देताना तोतया मुख्यमंत्री म्हणाले, जसे अनुद बोलते तसे करा. थेट मुख्यमंत्र्यांशी बोलणे झाल्याने 19 मार्च रोजी मंजूर झालेला बायोटाडा आणि 25 लाख रुपये घेण्याबाबतची मिटिंग ठरली. ब्रम्हांड आणि पातळीपाडाच्या दरम्यान असलेल्या तुळशी हॉटेलमध्ये दुपारी ही मिटिंग सुरू झाली. 

मंजूर बायोडाटावर मुख्यमंत्र्यांची सही होती. ठरल्याप्रमाणे डुंबरे यांनी 25 लाख रुपयांची बॅग त्यांना दिली आणि पोलिसांनी आरोपींना रंगेहाथ पकडले. याप्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात आरोपींविरोधात गुन्हा दाखल झाला आणि त्यांना अटक झाली. न्यायालयाने त्यांना  26 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. अधिक चौकशीअंती तोतया मुख्यमंत्री हा आलेफाटा येथील असल्याचे निष्पन्न झाले. अब्दुल्ला फैय्याज अन्सारी या तोतया मुख्यमंत्र्याला बुधवारी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आणि ठाण्यात आणले, अशी माहिती ठाणे गुन्हे अन्वेषण विभाग युनिट-5 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराम रनावरे यांनी दिली.