होमपेज › Mumbai-Thane-Raigad › अवैध वाढवलेले फ्लॅट्सही आता नियमित होणार!

अवैध वाढवलेले फ्लॅट्सही आता नियमित होणार!

Published On: Apr 27 2018 1:44AM | Last Updated: Apr 27 2018 1:44AMमुंबई : पुढारी वृत्तसेवा

शासकीय, पालिका नियमांनुसार व्यापारी जागा, फ्लॅटच्या  गॅलरी, डक्ट, कोनाड्यांसाठी सोडलेल्या जागा आत घेऊन आपला फ्लॅट, व्यावसायिक जागा वाढवणारे जागामालक, तसेच इमारतीवर अवैधरित्या वाढविण्यात आलेल्या मजल्यांवर राहणार्‍या रहिवाशांसाठी आता एक खूषखबर आहे. निश्‍चित केलेला प्रिमियम भरल्यानंतर सदर जागा तसेच मजले नियमित करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला असून अशा हजारो फ्लॅटधारकांना त्यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे. 

अतिक्रमण केल्याचा ठपका ठेवून अशा जागांवर दुप्पट टॅक्स, किंवा दंडाची रक्कम आकारण्यात येत होती. त्याचा मोठा भुर्दंड प्लॅटधारक किंवा व्यावसायिकास बसत होता. त्यामधूनही त्यांची सुटका होणार आहे. महापालिकेने घेतलेल्या नवीन निर्णयाने अवैध मजल्यांवर राहणार्‍या रहिवाशांची घरेही आता नियमित होणार असल्याने लाखो कुटुंबावर फ्लॅट तोडण्याची असलेली टांगती तलवार दूर होणार असल्याने नागरिकांनी सुटकेचा निःस्वास सोडला आहे. 

मुंबईमध्ये जागांची मोठी कमतरता आहे. त्यातच कुटुंबातील सदस्यांच्या संख्येचा विचार करता अनेक कुटुंबांना आहे ती जागाही कमी पडते. साहजिकच ते फ्लॅटबाहेर सोडलेल्या डक्ट, गॅलरी, कोनाड्यांच्या जागा आपल्या फ्लॅटमध्ये आत घेतात. अशा घटना निदर्शनास आल्यानंतर त्यातून भ्रष्टाचारालाही प्रोत्साहन मिळत होते. साहजिकच हा प्रश्‍न महापालिका, सरकारची मोठी डोकेदुखी ठरली होती. मात्र, आता  निश्‍चित करण्यात आलेला प्रिमियम भरल्यानंतर या जागा नियमित करण्यात येणार आहेत.  बिल्डरांनी नियमानुसार बांधण्यात येणार्‍या अनेक इमारतींवर अवैध मजले बांधले होते.

असे फ्लॅट खरेदी करणारांना त्याची कल्पना नसल्याने असे फ्लॅट कधीही पाडले जाऊ शकतात, या भीतीने असंख्य कुटुंबे संकटात होती. मात्र, असे मजलेही ठराविक प्रिमियम भरल्यानंतर नियमित करण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे अवैधरित्या वाढीव फ्लॅट, व्यापारी जागा तसेच अवैध मजल्यांवर राहणार्‍या रहिवाशांना दुप्पट कर भरावे लागत होते. मात्र, महापालिकेच्या निर्णयानुसार आता 
त्यामधून त्यांची सुटका होणार असून त्यांच्या जागा नियमित होणार आहेत. 

मुंबईचा नवा डीपी हा मुंबईकरांचा कमी आणि बिल्डरांचा अधिक असा सूर आता उमटू लागला असून, मुंबईत यापुढे टॉवर संस्कृती अधिक फोफावेल आणि ओघानेच गर्दी वाढेल, अशी भीती व्यक्‍त केली जात आहे. 

Tags : Mumbai, Mumbai news, Illegally increased flat, now be regular,