Sat, Jun 06, 2020 07:51होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबई अग्‍निशमन दलाचा ढिसाळ कारभार; फायर ऑडिटकडे दुर्लक्ष

मुंबई अग्‍निशमन दलाचा ढिसाळ कारभार; फायर ऑडिटकडे दुर्लक्ष

Published On: Jul 09 2018 12:52PM | Last Updated: Jul 09 2018 12:52PMमुंबई  : प्रतिनिधी 

मुंबईत आगीच्या घटनांमध्ये वाढ होत असून मुंबई अग्निशमन दलातर्फे फायर ऑडिटकडे दुर्लक्ष होत आहे. यामुळेच आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी मनपा वैद्याकिय महाविद्यालय-रुग्णालय सुरक्षिततेच्या दृष्टीने परिपूर्ण इमारतीची फायर ऑडिट झालेल्या इमारतीची माहिती मागितली असता सरळ आणि स्पष्ट माहिती देण्यास अग्निशमन दलाने टाळाटाळ केली आहे.

आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी मुंबई अग्निशमन दलाकडे मनपा महाविद्यालय-रुग्णालयच्या फायर ऑडिट, केलेल्या इमारतीची माहिती आणि फायर ऑडिट न झालेल्या इमारतींची यादी तसेच महाविद्यालय-रुग्णालयाच्या अग्नि सुरक्षिततेच्या दृष्टीने परिपूर्ण नाही. त्याअनुषंगाने अपेक्षित कार्यवाहीची माहिती दिनांक ३ जानेवारी २०१८ रोजी मागितली होती. जनमाहिती अधिकारी तथा विभागीय अग्निशमन अधिकारी एस.डी.सावंत यांनी जाणीवपूर्वक माहिती देण्याचे टाळत कळविले की, मुंबई अग्निशमन दलाचे अभिलेख हा इमारतीच्या सी.एस. क्रमांक व विभागानुसार परिरक्षित केला जातो. संबंधित इमरतीचा सी.एस. क्रमांक व विभागानुसार या कार्यालयास कळविण्यात यावा. जेणे करून माहिती पुरविणे शक्य होईल. पण किती महाविद्यालये-रुग्णालये सुरक्षिततेच्या दृष्टीने परिपूर्ण आहे, फायर ऑडिट अहवाल प्राप्त झाले आणि किती महाविद्यालय-रुग्णालय सुरक्षिततेच्या दृष्टीने परिपूर्ण नाहीत, याची माहिती दिली नाही. 

ही माहिती शकील अहमद शेख यांस प्रथम अपील दाखल केल्यानंतर २ महिन्यानंतर प्राप्त झाली. तरी २३ फेब्रुवारी २०१८ रोजी शकील अहमद शेख यांनी प्रथम अपील केल्यावर प्रथम अपिलीय अधिकारी ए.व्ही. बनगर यांनी सुनावणी ९ मे रोजी घेतली. यावेळी माहिती ८ दिवसाच्या आत शकील अहमद शेख यांना विनामूल्य देण्याचे आदेश देवून अपील निकाली काढण्यात आली. परंतु अद्याप जनमाहिती अधिकारी तथा विभागीय अग्निशमन अधिकारी एस.डी.सावंत यांनी माहिती दिली नसून ते जाणीवपूर्वक माहिती देण्याचे टाळत आहेत. 

मुंबईत बृहन्मुंबई महानगरपालिकेचे स्वत:ची चार वैद्यकीय महाविद्यालय-रुग्णालये, एक दंत रुग्णालय, ६ विशेष रुग्णालये, १६ सामन्य रुग्णालये, २९ मनपा  प्रसूतिगृह, १७५ मनपा दवाखाने आहेत. मुंबईतील ३४ अग्निशमन केंद्राच्या हद्दीतील नामनिर्देशित अधिकार्‍यांना इमारतीचे तपासणी करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. फायर ऑडिट सारखी महत्त्‍वाची माहिती अग्निशमन दल का देत नाही? तसेच मुंबई अग्निशमन दलाला स्वतःच्याच इमारतीचा सी.एस. क्रमांक माहीत नाही? गेल्यावर्षी मुंबईमध्ये आगीत कमीत कमी १३० लोकांचा मृत्यू झाला आहे. मनपा वैद्याकिय महाविद्यालय-रुग्णालये, सामन्य रुग्णालये, दंत रुग्णालये, प्रसूतिगृह आदींमध्ये आगीच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने परिपूर्ण व अग्निप्रतिबंधक यंत्रणा नाहीत. याठिकाणी एखादी आगीची दुर्घटना झाली आणि त्यात मोठी जीवितहानी झाली तर याला जबाबदार कोण राहणार? असा प्रश्न आहे.

शकील अहमद शेख यांनी अग्निशमन दलाच्या या टाळाटाळीची तक्रार पालिका आयुक्त अजोय मेहता यांच्याकडे केली आहे. मुंबईत जेव्हा आगीची घटना घडते तेव्हा अग्निशमन दलाने फायर ऑडिटकडे केलेले दुर्लक्ष सुद्धा तेवढेच कारणीभूत आहे. ही बाब निर्दशनास आल्याचे नमूद करत फायर ऑडिट सारखी महत्वाची माहिती ऑनलाईन केल्यास जे फायर ऑडिट करत नाही, त्यांना नाईलाजाने पुढाकार घेत करावी लागेल, असे शकील अहमद शेख यांनी शेवटी सांगितले.