Tue, Jul 16, 2019 01:47होमपेज › Mumbai-Thane-Raigad › बालेकिल्ल्यांवर भगवा

बालेकिल्ल्यांवर भगवा

Published On: Dec 12 2017 2:06AM | Last Updated: Dec 12 2017 1:58AM

बुकमार्क करा

मुंबई : प्रतिनिधी

नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्‍वर व इगतपुरी आणि सांगली जिल्ह्यातील जत नगरपालिकेसाठी झालेल्या निवडणुकीत सत्ताधारी भाजपा- शिवसेनेला समिश्र यश मिळाले. त्र्यंबकेश्‍वरच्या नगराध्यक्षपदी भाजपाचे पुरुषोत्तम लोहगावकर तर इगतपुरीच्या नगराध्यक्षपदी शिवसेनेचे संजय इंदूलकर विजयी झाले. जत नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदी काँग्रेसच्या शुभांगी बनेनवार विजयी झाल्या.
त्र्यंबकेश्‍वर नगरपालिकेत भाजपाने आपले वर्चस्व कायम राखले असून एकूण 17 जागांपैकी भाजपा 14, शिवसेना 2 तर एका जागेवर अपक्ष उमेदवार निवडून आला आहे. इगतपुरीत शिवसेनेने आपला गड कायम राखला असून एकूण 18 जागांपैकी शिवसेनेला 13, भाजपाला 4 तर एका जागेवर अपक्ष उमेदवार निवडून आला आहे. सटाणा नगरपालिकेच्या प्रभाग 5 मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीच्या आशा रमेश भामरे विजयी झाल्या.

सांगली जिल्ह्यात जतमध्ये भाजपाला धक्का  

संपूर्ण सांगली जिल्ह्याच लक्ष लागून राहिलेल्या जत नगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपाला पराभवाचा मोठा धक्का बसला आहे. नगराध्यक्षपदाच्या चुरशीच्या निवडणुकीत काँग्रेसच्या शुभांगी बनेनवार यांनी भाजपाच्या डॉ. रेणूका आरळी यांचा पराभव केला. नगरसेवकांचा विचार करता कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नाही. एकूण 20 जागांपैकी भाजपाला 7, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेला प्रत्येकी 6 जागा तर बसपाला एका जागेवर यश मिळाले.