Wed, Apr 24, 2019 16:24होमपेज › Mumbai-Thane-Raigad › होळीसाठी झाडांना हात लावाल, तर जेलमध्ये जाल

होळीसाठी झाडांना हात लावाल, तर जेलमध्ये जाल

Published On: Feb 28 2018 1:57AM | Last Updated: Feb 28 2018 1:54AMमुंबई : प्रतिनिधी 

बिल्डरांच्या फायद्यासाठी मुंबईत दरवर्षी हजारो झाडांची कत्तल करण्यास परवानगी देणार्‍या मुंबई पालिकेने होळीसाठी झाडांना हात लावाल, तर थेट जेलमध्ये जाल, असे धमकावले आहे. पालिकेच्या या फतव्यामुळे आता दहीहंडी व गणपतीनंतर होळीवरही बंधने आल्याची प्रतिक्रिया मुंबईकरांमध्ये उमटत आहेत. 

मुंबईत विकासाच्या नावाखाली गेल्या पाच वषार्ंत तब्बल 22 ते 25 हजार झाडांची कत्तल करण्यात आली आहे. यात 40 ते 50 वर्षे जुन्या झाडांचा मोठ्याप्रमाणात समावेश आहे. मेट्रो व मोनो रेल्वेसह रस्तारुंदीकरण व बिल्डरांच्या रखडलेल्या इमारतींसाठी झाडांची मोठ्याप्रमाणात कत्तल करण्यात आली आहे. येणार्‍या काळात मुंबईत येऊ घातलेल्या प्रकल्पासाठी वृक्षतोडीत अजूनच वाढ होणार आहे. पालिकेच्या वृक्षप्राधिकरण समितीच्या अधिकृत परवानगीने झाडांची कत्तल होत असल्यामुळे वृक्षप्रेमीही हतबल झाले आहेत. 

शहरात मोठमोठ्या वृक्षांची कत्तल होत असताना, डोळे बंद केलेल्या पालिकेने होळीसाठी वृक्षतोड करू नये असा फतवा काढला आहे. होळी सणाच्यावेळी सार्वजनिक रस्त्याच्या आजूबाजूची, सार्वजनिक परिसरातील तसेच खाजगी आवारातील झाडे जाळण्यासाठी तोडली जाण्याची शक्यता असते. यामुळे झाडांची संख्या कमी होऊन पर्यावरणालाही हानी पोहोचते. या बाबींना प्रतिबंध होण्याच्या दृष्टीने महापालिकेच्या उद्यान खात्यातील संबंधित अधिकारी व कर्मचारी यांनी होळी सणाला अधिक सतर्क रहावे, तसेच अनधिकृतपणे वृक्षतोड केल्याचे आढळल्यास संबंधित कायद्यातील तरतुदींनुसार कारवाई करावी, असे आदेश महापालिकेचे उद्यान अधीक्षक  जितेंद्र परदेशी यांनी दिले आहेत. एवढेच नाही तर, झाड तोडाल, तर थेट एक वर्षासाठी जेलमध्ये जाल असा इशाराही दिला आहे.

दरम्यान गेल्या काही वषार्ंपासून मुंबईत होळीसाठी झाडांच्या फांद्या तोडण्याचे प्रमाण कमी झाले आहे. अनेकजण लाकडाच्या वखारीतून लाकडे व तबेल्यातून शेणी आणून होळीचे दहन करत आहेत. त्यामुळे होळीलाच वृक्षतोड होते, असे पालिकेने सांगण्याचा प्रयत्न करू नये. पहिल्यांदा बिल्डरांसाठी वृक्षतोडीला देण्यात येणारी परवानगी बंद करा, असा सूर मुंबईकरांमध्ये उमटत आहे. 

पालिकेने झाडे तोडू नये, असे आवाहन करावे, पण जेलमध्ये टाकण्याची धमकी देऊ नये. टाकायचे असेल तर, आधी शहरातील जुन्या झाडांना कापण्याची परवानगी देणार्‍या वृक्ष प्राधिकरणावर कारवाई करावी, अशा प्रतिक्रियाही मुंबईकरांमध्ये उमटत आहेत.