Fri, May 24, 2019 02:48होमपेज › Mumbai-Thane-Raigad › तिकीट न मिळाल्यास आ. नरेंद्र पाटील भाजपच्या वाटेवर

तिकीट न मिळाल्यास आ. नरेंद्र पाटील भाजपच्या वाटेवर

Published On: Jun 29 2018 1:30AM | Last Updated: Jun 29 2018 1:18AMनवी मुंबई : प्रतिनिधी 

येत्या 26 जुलै रोजी विधान परिषदेतील 11 आमदारांची मुदत संपणार असून,विधान परिषदेसाठी निवडून देण्यात येणार्‍या 11 जागांसाठी निवडणूक येत्या 16 जुलै रोजी होणार आहे. मात्र विधानसभेतील संख्याबळानुसार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा फक्त एकच उमेदवार निवडून येणार असल्याने त्या जागेसाठी माथाडी नेते नरेंद्र पाटील यांची वर्णी लागावी यासाठी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भेट घेण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने संधी नाकारली तर अन्य पक्षानी त्यांना संधी द्यावी,त्यासाठी राज्यातील प्रमुख सत्ताधारी पक्षाकडे मागणी करू,असा ठाम निर्धारही कामगार कार्यकर्त्यांनी केला आहे. यामुळे माथाडी नेते नरेंद्र पाटील भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा पुन्हा एकदा रंगली आहे. दुसर्‍या पक्षाने उमेदवारी दिल्यास राजकीय हेतू बाजूला ठेवून कामगारांच्या हितासाठी माथाडी कामगार एकजूट ठामपणे उभी राहील, अशी माहिती माथाडी कामगारांकडून देण्यात आली आहे.

माथाडी कामगार नेते नरेंद्र यांना पुन्हा एकदा आमदार म्हणून विधान परिषदेत जाण्याची संधी द्यावी यासाठी आज  माथाडी कामगारांचे नेते,कार्यकर्ते यांच्या शिष्टमंडळाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भेट घेतली. 27 जूनला नवी मुंबईतील माथाडी भवनात माथाडी कामगारांची बैठक झाली. पाटील यांनाच पुन्हा आमदार म्हणून संधी का मिळावी याबाबत एकमुखी आग्रही भूमिका स्पष्ट केली. शिष्टमंडळामध्ये आमदार पाटील, अध्यक्ष एकनाथ जाधव,कार्याध्यक्ष गुलाबराव जगताप,संयुक्त सरचिटणीस वसंतराव पवार,आनंद पाटील, ऋषिकांत शिंदे,खजिनदार गुंगा पाटील,सूर्यकांत पाटील, पोपटराव देशमुख,  रविकांत पाटील उपस्थित होते. यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले की,आपल्या मागणीचा आम्ही सर्वतोपरी विचार करून पक्षाचे जेष्ठ नेते शरदचंद्रजी पवार यांचेशी नरेंद्र पाटील यांना महाराष्ट्र विधान परिषदेवर संधी देण्यासाठी चर्चा करू असे सांगिले.

आ. नरेंद्र पाटील यांची चार वर्षांपासून भाजपशी जवळीक

सन 2014 मध्ये भाजपा युतीचे सरकार आल्यानंतर माथाडी कामगारांचे न्याय्य प्रश्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,महसूलमंत्री चंद्रकांत पाटील,कामगार मंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांचेकडे मांडले,माथाडी कामगार चळवळ व संघटना केंद्रबिंदू मानून आ. नरेंद्र पाटील यांनी कामगारांच्या प्रश्नांवर चर्चा केली. सन 2016 मध्ये अण्णासाहेबांच्या जयंतीदिनी  नवी मुंबई येथे आयोजित केलेल्या माथाडी कामगारांच्या भव्य मेळाव्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बोलाविले,या मेळाव्यात माथाडी कामगारांच्या पाठीशी सरकार ठामपणे उभे आहे,अशी भूमिका मुख्यमंत्र्यांनी मांडली. मुख्यमंत्र्यानी माथाडी कामगारांचे न्याय्य प्रश्न समजावून घेऊन ते सोडविण्याचे आश्वासन दिले,काही मागण्या मान्य केल्या.