Fri, Jul 03, 2020 03:57होमपेज › Mumbai-Thane-Raigad › महाराष्ट्र काँग्रेसमध्ये खांदेपालटाची चर्चा; नाना पटोले म्हणाले...

महाराष्ट्र काँग्रेसमध्ये खांदेपालटाची चर्चा; नाना पटोले म्हणाले...

Last Updated: May 28 2020 9:00PM

बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, नाना पटोलेनवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा  

महाराष्ट्रात कोरोना संकटकाळातही राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राज्यातील नेत्यांच्या राज्यपालांना भेटण्याचे सत्र सुरु असतानाच महाराष्ट्र काँग्रेसमध्ये खांदेपालटाची चर्चा रंगली आहे. 

सध्या काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे आहे. मंत्रिपद, महाविकास आघाडीशी समन्वय आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्षपद अशी तिहेरी जबाबदारी थोरात सांभाळत आहेत. तर, काँग्रेसमधील अनुभवी चेहरा असलेले पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे कोणतेही मंत्रीपद नाही, शिवाय पक्षातही महत्त्वाची जबाबदारी त्याच्याकडे नाही. त्यांच्या अनुभवाचा फायदा करुन घेण्यासाठी काँग्रेसमध्ये या अंतर्गत घडामोडी सुरु असल्याचे बोलले जात आहे. चव्हाणांना विधानसभा अध्यक्षपद देऊन, आक्रमक नाना पटोले यांना विरोधकांविरोधात थेट मैदानात उतरवण्याची तयारी काँग्रेसकडून केली जात असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. 

दरम्यान, पक्षाने महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी दिली, तर आनंदच होईल, अशी प्रतिक्रिया विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी गुरुवारी दिल्लीत व्यक्त केली. काँग्रेस श्रेष्ठींकडून पटोलेंना प्रदेशाध्यक्षपद देण्यासंबंधी विचारविमर्श केला जात असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. पटोलेंना पक्षाकडून यासंबंधी विचारणा करण्यात आली असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. पक्षाने जबाबदारी सोपवली तर, पदाला योग्य न्याय देवू अशी प्रतिक्रिया पटोलेंकडून व्यक्त करण्यात आली आहे. पंरतु, पक्षात तूर्त यासंबंधी कुठलाही विचार केला जात नसल्याची स्पष्टोक्ती त्यांनी दिली.

महाराष्ट्रात कोरोना संकटकाळातही राजकीय घडामोडींना वेग आला आहे. पटोलेंच्या जागी काँग्रेसचे दिग्गज नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी देण्याच्या हालचाली सुरु असल्याचे यानिमित्ताने बोलले जात आहे.

पटोले गेल्या दोन दिवसांपासून दिल्ली दौऱ्यावर होते. काँग्रेस नेते राहुल गांधी यांची ते भेट घेणार होते. सध्याच्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर या दोघांमध्ये चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात होती. पंरतु, ही भेट होऊ शकली नाही. ‘कोरोना’ संकटामुळे आपण पुढच्या वेळी भेट घेऊ, असा निरोप राहुल गांधींकडून पटोलेंना देण्यात आलाचे कळते.