Fri, Dec 13, 2019 18:33होमपेज › Mumbai-Thane-Raigad › उघड्यावर दूषित पदार्थ विकल्यास जन्मठेप!

उघड्यावर दूषित पदार्थ विकल्यास जन्मठेप!

Published On: Jun 20 2019 2:07AM | Last Updated: Jun 20 2019 2:07AM
मुंबई : विशेष प्रतिनिधी

उघड्यावर दूषित अन्नपदार्थांची विक्री करणार्‍या फेरीवाल्यांना यापुढे जन्मठेपेची शिक्षा केली जाणार आहे. अशा शिक्षेची तरतूद असलेला कायदा तयार केला जाईल व त्यानुसार काटेकोर अंमलबजावणी केली जाईल, असे आश्‍वासन अन्न व औषध प्रशासन राज्यमंत्री मदन येरावार यांनी बुधवारी विधानसभेत दिले.

मुंबईत उघड्यावर विक्री केल्या जाणार्‍या रस्त्यावरील लिंबू सरबत आणि उसाच्या रसासाठी वापरले जाणारे पाणी आणि बर्फ हे दूषित असल्याचे स्पष्ट झाल्याने यासंदर्भात मांडलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना येरावार म्हणाले, जन्मठेपेच्या शिक्षेची तरतूद असलेले विधेयक राज्यपालांकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आलेले आहे. या विधेयकावर राज्यपालांची स्वाक्षरी झाल्यानंतर संबंधित कायद्यातील तरतुदीनुसार उघड्यावर अन्नपदार्थ विकणार्‍या दोषींना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली जाईल, असे येरावार यांनी सभागृहात सांगितले. यापुढे ‘क्लीन स्ट्रीट फूड’ योजना सरकार राबवणार असल्याचे सांगत येरावार म्हणाले,   त्यासाठी 5000 जणांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. अन्न व औषध प्रशासन, मनपा, रेल्वे विभाग यांनी अशा दोषी विक्रेत्यांवर संयुक्तपणे कारवाई सुरू केल्याचे ते म्हणाले.  सध्या विक्रीवर बंदी घालावी, अशा सूचना अन्न व औषध प्रशासन विभागाने दिल्या असल्याचे ते म्हणाले. यावेळी संजय केळकर यांनी अशा विक्रेत्यांकडून तडजोड रक्कम भरून न घेता त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत आणि कडक कारवाई करावी, अशी मागणी केली.