Fri, Jul 19, 2019 00:53होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुख्यमंत्री बदलल्यास पाठिंबा काढू; अपक्ष आमदारांचा इशारा

मुख्यमंत्री बदलल्यास पाठिंबा काढू; अपक्ष आमदारांचा इशारा

Published On: Jul 26 2018 11:56AM | Last Updated: Jul 26 2018 12:01PMमुंबई : पुढारी ऑनलाईन 

महाराष्ट्रात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन आंदोलन तीव्र झाले असताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपचे काही नेते नेतृत्वबदलाची चर्चा करत असल्याचे वक्तव्य केले होते. याचे खंडन करत महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर विश्वास असून तेच मुख्यमंत्री राहतील असे स्पष्ट केले होते. तसेच दुकाने बंद झाल्यानेच नेतृत्वबदलाच्या चर्चा केल्या जात असल्याचे म्हणत महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी टोला लगावला होता. 

चंद्रकांत पाटील यांच्यानंतर आता सहा अपक्ष आमदारांनीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पाठिशी असल्याचे सांगितले आहे. जर सरकारने मुख्यमंत्री बदलले तर आम्ही सरकारसोबत राहणार नसल्याचा इशारा अपक्ष आमदार रवी राणा यांनी दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सक्षम असल्याचेही ते म्हणाले. देवेंद्र फडणवीस यांनी जनतेची कामे केली आहेत. सक्षम मुख्यमंत्री बदलण्याचा प्रयत्न केल्यास आम्ही मुख्यमंत्र्यांच्या पाठिशी आहोत. आम्ही मुख्यमंत्री बदलू देणार नाही. अपक्ष म्हणून काम करतानाही त्यांनी सहकार्य केले असे अपक्ष आमदार रवी राणा यांनी सांगितले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षणासंदर्भात सरकार प्रामाणिक असून चर्चेसाठी सदैव तयार असल्याचे म्हटले होते. त्यांनी आंदोलकांना हिंसा न करण्याचे आवाहनही निवेदनामार्फत केले होते. पंढरपूर येथील विठ्ठलाच्या महापूजेसाठी येऊ देणार नसल्याची भूमिका आंदोलकांनी घेतली होती. तेव्हा मुख्यमंत्री फडणवीस यांनी लोकांच्या भावनेचा विचार करत महापूजेसाठी न जाण्याचा निर्णय घेतला होता.