होमपेज › Mumbai-Thane-Raigad › आयपीएस अधिकार्‍याचा इगो दुखावतो तेव्हा!

आयपीएस अधिकार्‍याचा इगो दुखावतो तेव्हा!

Published On: Dec 08 2017 1:40AM | Last Updated: Dec 08 2017 1:15AM

बुकमार्क करा

मुंबई : अवधूत खराडे

राजकारणातील बड्या व्यक्तीच्या वरदहस्तातून एक अधिकारी गुन्हे शाखेच्या महत्वाच्या अशा कक्षामध्ये वरीष्ठपदी विराजमान झाल्याने आयपीएस अधिकार्‍याचा इगो दुखवला जाऊन आयपीएस आणि कनिष्ठ अधिकार्‍यांतील वादाचा आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याच रागातून आयपीएस अधिकार्‍याने गेल्या काही महिन्यांत या अधिकार्‍याला सुमारे शंभर मेमो पाठवत चोहोबाजूने नाकाबंदी केली असून येत्या काळात हा वाद विकोपाला जाण्याची शक्यता आहे.

मुंबईमध्ये कुटूंबासोबत राहत असलेल्या एका अधिकार्‍याला आयपीएस लॉबीने टार्गेट करत त्याची रवानगी विदर्भातील जिल्ह्यांमध्ये केली. याठिकाणी कार्यरत असताना कुटूंब मुंबईत असल्याने या अधिकार्‍याने रविवारीसुद्धा ऑनड्युटी राहून आपले कर्तव्य चोख बजावले. हा अधिकारी कर्तव्य बजावत असलेल्या ठिकाणच्या राजकीय नेत्याला राज्यात महत्वाचे पद मिळाले. त्यांच्याच वरदहस्ताखाली या अधिकार्‍याला पुन्हा मुंबईमध्ये पोस्टींग आणि गुन्हे शाखेतील एका महत्वाच्या कक्षामध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदी नियुक्ती दिली. यामुळे आयपीएस अधिकार्‍याचा इगो दुखावला गेल्याची माहिती कळते.

राजकीय वरदहस्तातील अधिकारी नियुक्त असलेल्या कक्षातील कामगिरीचा आढावा घेत, आयपीएस अधिकार्‍याने कक्षावर कारवाई करण्यास सुरूवात केली आहे. मात्र कक्षातील अधिकार्‍यानेही या दबावासमोर न झुकता दंड थोपटले असल्याने मुंबई पोलीस दलातील हा वाद आणखीनच चिघळणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.