Thu, Jun 27, 2019 13:40होमपेज › Mumbai-Thane-Raigad › आयपीएलला मिळणारे पाणी धोक्यात

आयपीएलला मिळणारे पाणी धोक्यात

Published On: Mar 09 2018 2:06AM | Last Updated: Mar 09 2018 1:28AMमुंबई : प्रतिनिधी 

राज्यात पाण्याच्या दुष्काळाचे संकट असेल तर आयपीएलसारख्या मनोरंजन हेतूसाठी पाणीपुरवठा केला जाऊ शकत नाही, असे उच्च न्यायालयाने स्पष्ट केले. आयपीएलच्या पर्वादरम्यान क्रिकेटच्या धावपट्ट्यांची देखभाल करण्यासाठी  मोठ्याप्रमाणात पाण्याचा अपव्यय होत असल्याचा आरोप करणार्‍या याचिकांवर न्यायमूर्ती अभय ओक आणि न्यायमूर्ती रियाझ छागला यांच्या खंडपीठाने हा इशारा दिला.

आयपीएलच्या सामन्यांसाठी खेळपट्टीवर पाण्याच्या उधळपट्टीविरोधात लोकसत्ता मूव्हमेंट या स्वयंसेवी संस्थेने उच्च न्यायालयात धाव घेऊन मैदानांच्या देखभालीवर लाखो लिटर्स पाण्याचा होणारा अपव्यय आणि उधळपट्टी रोखा अशी विनंती करणारी जनहित याचिका दाखल केली आहे. त्या याचिकेवर न्यायमूर्ती अभय ओक आणि न्यायमूर्ती रियाझ छागला यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली़.  

यावेळी मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या वकिलांनी धावपट्टी देखभालीसाठी पिण्याच्या पाण्याचा गैरवापर होत नसल्याचा दावा केला. तसेच रेनवॉटर हार्वेस्टिंग सिस्टमचा वापर केला जातो. तसेच विहिरींतील पाणी वापरले जात असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. न्यायालयाने दुष्काळ परिस्थिती असेल तर आयपीएल सामन्यांसाठी पाणी वापरता येणार नाही असा इशारा देताना परिस्थिती पाहून पाण्याच्या वितरणाच्या प्राधान्यासंबंधी अंतिम निर्णय दिला जाईल असे स्पष्ट केले़.