Thu, Apr 25, 2019 03:29होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ‘आयपीएल’ सट्टेबाजीचे सिंडिकेट उघड

‘आयपीएल’ सट्टेबाजीचे सिंडिकेट उघड

Published On: May 06 2018 2:01AM | Last Updated: May 06 2018 1:30AMमुंबई, नाशिक : प्रतिनिधी

आयपीएलमधील क्रिकेट सामन्यांवर ऑनलाइन, मोबाइलवरून सट्टा लावणार्‍या  उत्तर महाराष्ट्रातील 14 बुकींना अटक करण्यात आली असून त्यामध्ये जळगाव जिल्ह्यातील चोपडा येथील एका भाजपा पदाधिकार्‍यासह पाच जणांचा समावेश आहे. दुसर्‍या घटनेत नाशिकरोड रेल्वेस्थानकातून सात, तर मनमाडमधून दोन बुकींना ताब्यात घेण्यात आले आहे.

छत्तीसगढ येथील सात सट्टेबाजांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नाशिकरोड रेल्वे स्थानकातून ताब्यात घेतले आहे. सातही सट्टेबाज छत्तीसगढ पोलिसांच्या रेकॉर्डवरील बुकी असून, त्यांना पकडून देणार्‍यास 10 हजार रुपयांचे बक्षीसही जाहीर केलेले आहे. या सट्टेबाजांकडून हायटेक यंत्रणेसह 25 मोबाइल व रोकड असा चार लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्‍त करण्यात आला आहे.

छत्तीसगढ राज्यातील बिलासपूर पोलिसांनी नाशिक ग्रामीण पोलिसांशी संपर्क साधून त्यांच्याकडील सात फरार सट्टेबाज नाशिक किंवा शिर्डी येथे येणार असल्याचे सांगितले होते. त्यानुसार पोलीस अधीक्षक संजय दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक कर्पे व त्यांच्या पथकाने नाशिकरोड रेल्वेस्थानकावर सापळा रचला व  गीतांजली एक्स्प्रेसमधून सातही संशयितांना ताब्यात घेतले. या सट्टेबाजांकडे 25 महागडे मोबाइल, लॅपटॉप, पेनड्राइव्ह, डायर्‍या असा मुद्देमाल आढळून आला. ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक आशिष आडसूळ यांच्या पथकाने केली. संशयितांना छत्तीसगढ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

मनमाडमध्ये जिल्हा पोलीसप्रमुखांच्या विशेष पथकाने शहरातील एका बंगल्यावर रात्री छापा मारून आयपीएलच्या क्रिकेट सामन्यावर सट्टा घेणार्‍या दोन जणांना अटक केली, तर तीन जण फरार झाले आहेत. आरोपींकडून एक लाख 90 हजार रोख रकमेसह लॅपटॉप, मोबाइल आणि धनादेश जप्त करण्यात आला.

तिसर्‍या घटनेत चोपड्यातील भाजपाचे ज्येष्ठ पदाधिकारी घनश्याम अग्रवाल यांना रायगड जिल्ह्यातील खालापूर पोलिसांनी शनिवारी सकाळी चोपड्यातून अटक केली.  या प्रकरणात पाच बड्या बुकींसह एका बँक मॅनेजरसह एकूण आठ जणांना अटक करण्यात आली आहे.

रायगड जिल्ह्यातील खालापूर पोलीस ठाणेअंतर्गत असलेल्या चौक गावातील लीलाई हॉटेलमध्ये आयपीएलवर सट्टा बेटिंग सुरू  असताना काहीजणांना अटक केली होती. त्यांच्या चौकशीत आरोपींचे पुण्यातील बुकीशी कनेक्शन आढळल्यानंतर विजय  अग्रवाल या बुकीस व घनश्याम अग्रवाल यांना  अटक करण्यात आली.  

Tags : Mumbai, mumbai news, IPL betting, syndicate, revealed,