Thu, Nov 15, 2018 16:29होमपेज › Mumbai-Thane-Raigad › आयआयटी मुंबईच्या इंजिनीयरसह १६ तरुण होणार संन्याशी

आयआयटी मुंबईच्या इंजिनीयरसह १६ तरुण होणार संन्याशी

Published On: Jan 12 2018 1:54AM | Last Updated: Jan 12 2018 1:11AM

बुकमार्क करा
मुंबई : प्रतिनिधी

मुंबई आयआयटीमधून केमिकल इंजिनीयरींगची पदवी घेतलेल्या संकेत पारेखसह 16 उच्चशिक्षित तरूण जैन धर्माची संन्यासाची दीक्षा घेऊन संन्याशी बनणार आहेत. मोठ्या वेतनाची नोकरी व सुखसुविधांनी युक्त जीवनाचा त्याग करून हे तरूण संन्याशी बनणार आहेत. बोरीवली येथील प्रमोद महाजन मैदानावर 19 ते 22 जानेवारी दरम्यान होणार्‍या विजय प्रस्थान महोत्सवामध्ये हे तरूण दीक्षा घेणार आहेत. जैन आचार्य युगभूषणसुरीजी (पंडित महाराज) यांच्या मार्गदर्शनाखाली होणार्‍या या कार्यक्रमात देशाच्या विविध भागांतून जैन समाजाचे 75 हजारहून अधिक नागरिक उपस्थित राहणार आहेत. 

दीक्षा कार्यक्रम 22 जानेवारीला पहाटे साडेपाच वाजता सुरू होईल. जैन समाजाच्या तीन मोठ्या संस्था गीतार्थ गंगा, कल्याण मित्र परिवार व ज्योत इंडिया हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करत आहेत. दीक्षा घेणार्‍यांमध्ये केवळ जैन समाजाच्या तरूणांचाच नव्हे तर दुसर्‍या समाजाच्या तरूणांचाही समावेश आहे. संकेत पारेख हा जैन समाजाचा नसतानाही दीक्षा घेणार आहे. त्याशिवाय 45 वर्षीय चेतन देधिया, 41 वर्षीय चंद्रेश पोलादिया, इंडस्ट्रीयल इलेक्टॉनिक्समध्ये पदविका मिळवलेले 39 वर्षीय प्रीतेश लोधया, त्यांची पत्नी हेमल लोधया व मुलगी याशिका लोधिया हे कुटुंब दीक्षा घेणार आहे. एमएमसी उत्तीर्ण झालेले 32 वर्षीय वीरल देधिया आयटीमध्ये बीएससी व वेब डिझाईनरचे काम करणारी 26 वर्षीय परीन शाह, बीएससी असलेली 42 वर्षीय कीर्तीका अशोक देधिया आपल्या दोन जुळ्या मुली ख्याती व खुशबू देधियासह दीक्षा घेणार आहेत. त्याशिवाय एमबीएचे शिक्षण घेणारी 26 वर्षीय स्नेहा कटारिया, विधी अभ्यासक्रम शिकत असलेली 20 वर्षीय दृष्टी देधिया, प्रिया फुरिया व 42 वर्षीय मीता देधिया आपल्या धर्मिल देधिया या मुलासहीत दीक्षा घेणार आहेत, अशी माहिती आयोजकांनी दिली.