Thu, Jan 17, 2019 14:16होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबई महापालिका आयुक्तांचा खास एसएमएस

कमला मील दुर्घटनेमुळे सनदी अधिकारी उतरले रस्त्यावर

Published On: Dec 31 2017 2:07AM | Last Updated: Dec 31 2017 8:05AM

बुकमार्क करा
मुंबई :

कमला मिल दुर्घटनेमुळे मुंबई महापालिका मुख्यालयात एसी दालनात बसणारे सनदी अधिकारी पहिल्यांदा रस्त्यावर उतरले आहेत. मुंबई शहरासह पश्‍चिम व पूर्व उपनगरांत सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामांच्या कारवाईचा पालिकेतील अतिरिक्त आयुक्तांनी आढावा घेतला. नेहमीच उपायुक्त व सहाय्यक आयुक्तांना आपल्या दालनात बोलावून आढावा घेणारे अतिरिक्त आयुक्त रस्त्यावर उतरले होते. अतिरिक्त आयुक्त आबासाहेब जर्‍हाड व विजय सिंगल या दोघांनी मुंबईत सुरू असलेल्या कारवाईच्या ठिकाणी भेट घेऊन, कारवाई योग्यरितीने चालली आहे का ? याचा आढावा घेतला. एवढेच नाही तर, एकाही अनधिकृत बांधकामाची गय करू नका, असा आदेशही त्यांनी दिला आहे. दरम्यान पालिका आयुक्त अजोय मेहताही या कारवाईवर लक्ष ठेऊन आहेत. त्यामुळे थर्टीफर्स्टची मज्जा विसरून सहाय्यक आयुक्तांसह उपायुक्त व अतिक्रमण विभागाचे अधिकारी कामाला लागले आहेत.

मुंबई महापालिका आयुक्तांचा खास एसएमएस
कमला मिल अग्निकांडामुळे टीकेचे धनी बनलेले मुंबई महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी सर्व सहाय्यक आयुक्त, उपायुक्तांना खास एसएमएस पाठवला. त्यानुसार सर्व विभागीय उपायुक्त आणि वॉर्ड अधिकार्‍यांनी विशेष पथके स्थापन करावीत. त्यात बिल्डिंग व फॅक्टरी विभागाचे कर्मचारी असावेत. वैद्यकीय अधिकारी आणि अग्निशमन दलाचेही प्रतिनिधी असावेत. ही पथके त्या-त्या वॉर्डातील सर्व हॉटेलांची तपासणी करून अग्निशमन यंत्रणा आहे किंवा नाही याची खातरजमा करतील. हॉटेल परिसरात अतिक्रमणमुक्त खुली जागा आहे का, आग भडकल्यास सुटकेचे मार्ग आहेत का, जीन्यांची स्थिती काय आहे, हेदेखील ही पथके तपासतील.