Thu, Nov 22, 2018 16:05होमपेज › Mumbai-Thane-Raigad › बिगर राज्य नागरी सेवेतून आयएएस शिफारशींचे निकष बदलले

बिगर राज्य नागरी सेवेतून आयएएस शिफारशींचे निकष बदलले

Published On: Jan 22 2018 1:48AM | Last Updated: Jan 22 2018 1:07AMमुंबई : प्रतिनिधी

आयएएस सेवेत जाण्यासाठीचे जे तीन टप्पे आहेत त्यापैकी बिगर राज्य नागरी सेवेतून त्यासाठी शिफारस करण्याच्या निकषात बदल करण्यात आले आहेत. त्यानुसार 10 वर्षाचे गोपनीय अहवाल तपासणे, सलग  आठ वर्षाची सेवा ग्राह्य धरणे यासह अन्य निकषांचा समावेश आहे.

आायएएस साठी स्पर्धा परीक्षा पद्धतीने थेटपणे,राज्य नागरी सेवेतून  पदोन्नतीने किंवा बिगर राज्य नागरी सेवेतून निवडीने नियुक्ती होत असते. त्यापैकी बिगर राज्य नागरी सेवेतून जी शिफारस केली जाते त्यासाठी एका अधिकार्‍याच्या निवडीमागे पाच नावांची शिफारस करण्यात येते. 

राज्यातून दोन अधिकार्‍यांना यातून संधी मिळते. त्यामुळे दहा अधिकार्‍यांच्या नावाची  शिफारस केली जाणार आहे. यामध्ये केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या निकषानुसार बदल करण्यात आले आहेत. अत्युत्कृष्ठ गुणवत्ता व क्षमता,  उपजिल्हाधिकारी पदाच्या समकक्ष अशा जाहीर करण्यात आलेल्या पदावर किमान आठ वर्षाची सलग सेवा व निवडसूचीच्या तारखेपर्यंत वय 56 वर्षापेक्षा जास्त नसावे, अशी पात्रता निश्‍चित करण्यात आली आहे. त्याचबरोबर 2017 ची जी निवडसूची तयार करण्यात येणार आहे त्यापूर्वीच्या दहा वर्षाचे सीआर तपासले जाणार आहेत. त्यातील  किमान 9 सीआर हे अत्युत्कृष्ट असणे आवश्यक आहे.

या  निकषात जे बसतील त्यांना  20 गुणांची लेखी चाचणीही द्यावी लागणार आहे. त्यानंतर सेवाज्येष्ठता, गोपनीय अहवाल व मुलाखतीनुसार 100 गुण हे त्यासाठी देण्यात येणार आहेत.यातून गुणानुक्रमे 30 अधिकार्‍यांच्या मुलाखती घेऊन 10 अधिकार्‍यांची शिफारस केली जाणार आहे. त्यापैकी  दोघांना आयएएस श्रेणीत नियुक्ती मिळणार आहे.