मुंबई : विशेष प्रतिनिधी
राज्य प्रशासनात फेरबदल करण्यात आले असून शेतकरी कर्जमाफी आणि शिक्षण प्रतिपूर्ती योजनेच्या ऑनलाईन प्रक्रीयेमुळे वित्त विभागाचे सचिव म्हणून बदली करण्यात आलेल्या विजय गौतम यांना वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्या विभागात ठेवण्यास विरोध केला होता. या विरोधामुळे गौतम यांची बदली आता पर्यटन विभागाच्या सचिवपदी करण्यात आली आहे.
आयटी विभागाचे सचिव म्हणून गौतम यांच्याकडे पदभार असताना शेतकरी कर्जमाफी योजना आणि फी प्रतिपूर्ती योजनेच्या ऑनलाईन प्रक्रीयेत मोठा गोंधळ झाला. त्यामुळे राज्य सरकारला टीकेचा सामना करावा लागला होता. त्याचा परिणाम म्हणून गौतम यांची तडकाफडकी वित्त विभागात बदली करण्यात आली. मात्र, आयटी विभागातील गोंधळामुळे सतर्क झालेल्या मुनगंटीवार यांनी त्यांना आपल्या विभागात ठेवण्यास विरोध केल्यानंतर त्यांना अन्यत्र कोठे हलवायचे याबाबत विचार सुरु होता. अखेर त्यांना पर्यटन विभागात पाठविण्यात आले.
मनिषा खत्री यांची अमरावती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी, अमरावती जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी किरण कुलकर्णी यांची आदीवासी संशोधन आणि विकास संस्थेचे आयुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे. अन्यही काही अधिकार्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.
मराठवाड्यात मोठे प्रशासकीय फेरबदल करण्यात आले असून औरंगाबादचे विभागीय आयुक्त पुरोषोत्तम भापकर यांची बदली पशुसंवर्धन विभागात करण्यात आली असून तेथे बीड जिल्ह्यात जिल्हाधिकारी म्हणून गाजलेल्या सुनील केंद्रेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय बीड, जालना, आणि परभणी जिल्हा परिषदेला नवे मुख्य कार्यकारी अधिकारी देण्यात आले आहेत. तर लातूरच्या जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकार्यांचीही बदली करण्यात आली आहे.
केंद्रेकर मराठवाड्याचे विभागीय आयुक्त
बीड जिल्ह्यात जिल्हाधिकारी म्हणून सुनील केंद्रेकर लोकप्रिय ठरले होते. त्यांनी बीड जिल्ह्यातील अवैध कामांना चाप लावताना जनहिताची कामे केली होती. त्यामुळे त्यांची बदली झाल्यानंतर जिल्ह्यात उत्स्फूर्त बंदही पाळण्यात आला होता. सध्या पुण्यात क्रीडा आयुक्तपदी असलेल्या केंद्रेकर यांना पुन्हा मराठवाड्यात विभागीय आयुक्त म्हणून पाठविण्यात आले आहे. बीड जिल्हा परिषदेवर मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून अमोल ऐडगे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते आदिवासी विकास विभागात नाशिक येथे प्रकल्प अधिकारी म्हणून काम करीत होते.
जालना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकार्यांच्या रिक्त जागी आदिवासी विकास विभागात नंदूरबार प्रकल्प अधिकारी म्हणून काम करणार्या निमा अरोरा यांची बदली करण्यात आली आहे. तर लातूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी माणिक गुरसळ यांची शैक्षणिक फी शुल्क नियमाक प्राधिकरणाचे सचिव म्हणून बदली करण्यात आली आहे. भंडार्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी बी. पी. पृथ्वीराज यांची परभणी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारीअधिकारीपदी बदली झाली आहे. गृहनिर्माण विभागातील सहसचिव बी. जी. पवार यांना आयएएस म्हणून पदोन्नती मिळाल्यानंतर त्यांना सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नेमण्यात आले. मात्र, त्यांची ही बदली रद्द झाली असून तेथे मंजू लक्ष्मी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.