Tue, Mar 19, 2019 20:26होमपेज › Mumbai-Thane-Raigad › पत्नीला अद्दल घडवण्यासाठी पतीचा स्वत:च्याच हत्येचा बनाव

पत्नीला अद्दल घडवण्यासाठी पतीचा स्वत:च्याच हत्येचा बनाव

Published On: Jun 26 2018 1:15AM | Last Updated: Jun 26 2018 12:56AMमुंबई : प्रतिनिधी

हुंड्यासाठी मानसिक व शारीरिक शोषण केल्याची तक्रार करुन नाहक त्रास दिल्याचा रागातून पत्नीसह तिच्या कुटुंबियांना अद्दल घडविणसाठी पतीने स्वतःच्याच हत्येचा बनाव करुन उत्तर प्रदेशातून पळ काढला, मात्र मिसिंग असलेला हा पती दोन वर्षांनी मिरारोड येथे सापडला. त्यामुळे हत्येच्या गुन्ह्यात खटला सुरु असलेल्या पत्नीसह इतर कुटुंबियांची आता लवकरच तेथील लोकल कोर्टाकडून निर्दोष सुटका होणार आहे. पन्नेलाल मुन्नीलाल यादव असे या 35 वर्षीय आरोपी पतीचे नाव असून त्याचा दोन दिवसांनी उत्तर प्रदेश पोलिसांना ताबा दिला जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

उत्तर प्रदेशातील महराजगंज, गुलरिहा गावचा पन्नेलाल यादव हा रहिवाशी आहे. त्याचा त्याच गावातील एका तरुणीशीसोबत विवाह झाला. मात्र हुंड्यावरुन होणार्‍या भांडणानंतर त्याची पत्नी माहेरी निघून गेली होती. त्यानंतर तिने पती पन्नेलाल आणि त्याच्या घरच्या मंडळीविरुद्ध स्थानिक पोलिसांत तक्रार केली. याप्रकरणी पतीसह सर्व आरोपींविरुद्ध हुंड्यासाठी मानसिक व शारीरिक शोषण केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला. पुढे संबंधित प्रकरण दोन्ही कुटुंबियांनी आपसात मिटवून टाकण्याचा निर्णय घेतला. 15 ऑक्टोबरला पन्नेलाल हा त्याच्या सासरी उसने दिलेले पैसे घेण्यासाठी गेला आणि परत आला नाही. पत्नीसह तिच्या कुटुंबियांनी हत्या करुन त्याच्या हत्येचा पुरावा नष्ट केल्याचा आरोप पन्नेलालच्या कुटुंबियांनी करुन पोलिसांत तक्रार केली होती. 

पन्नेलाल याला ताब्यात घेतल्यानंतर चौकशीत त्याने त्याच्या पत्नीने त्याच्याविरुद्ध 498 कलमांतर्गत तक्रार केली होती. त्याचा मनात राग होता. त्यामुळे पत्नीसह तिच्या कुटुंबियांना अद्दल घडविण्याची त्याने योजना बनविली होती. त्याच्या पालकांना काही सूचना करुन तो सासरी गेला आणि मेहुण्यासोबत बाहेर जात असल्याचे सांगून तेथून पळून गेला होता. ठरल्याप्रमाणे त्याच्या कुटुंबियांनी नंतर त्याच्या पत्नीसह इतरांविरुद्ध हत्येसह हत्येचा पुरावा नष्ट केल्याप्रकरणी पोलिसांत तक्रार केली होती. ही माहिती मिळताच पन्नेलाल हा मुंबईतून मिरारोड येथे आला. मिळेल ते काम करुन तो तिथे राहत होता. अधूनमधून तो त्याच्या कुटुंबियांच्या संपर्कात होता. त्याला ताब्यात घेतल्याची माहिती उत्तर प्रदेशच्या कोल्हुई पोलिसांना कळविण्यात आली आहे. लवकरच त्याचा ताबा संबंधित पोलिसांना देण्यात येणार आहे.