Mon, May 20, 2019 08:02होमपेज › Mumbai-Thane-Raigad › हुंडा मागितल्याने नवरदेवास ठोकल्या बेड्या

हुंडा मागितल्याने नवरदेवास ठोकल्या बेड्या

Published On: Jun 29 2018 1:36AM | Last Updated: Jun 29 2018 12:53AMकल्याण : वार्ताहर

लाखोंचा खर्च करून आपल्या मुलीचा साखरपुडा केला. मात्र नवरदेवासह त्याच्या कुटुंबाने हुंड्याची केलेली मागणी पूर्ण करता न आल्याने लग्न मोडल्याची गंभीर घटना कल्याण पश्चिम चिकणघर परिसरात उघडकीस आली आहे. याबाबत महात्मा फुले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून संतोष पाटील या नवरदेवास पोलिसांनी  बेड्या ठोकल्या आहेत. तर, लग्न मोडल्याचा मोठा मानसिक धक्का सदर मुलीला बसला असून तिने घरातून बाहेर पडणेही बंद केले आहे. 

नवर्‍यामुलाकडून रोकड, सोने, गाडीसाठी  10 लाख रुपयांची मागणी करण्यात आली. परंतु, परिस्थित बेताची असल्याने आपण हे देऊ शकत नसल्याचे तरुणीच्या कुटुंबीयांनी सांगत त्यांना विनवण्याही केल्या. मात्र त्यांनी काहीही ऐकून घेतले नाही.त्यानंतर त्यांनी 7 मे रोजी ठरलेल्या लग्नास नकार दिला. लग्न तुटल्याने सदर पीडित मुलीला मानसिक धक्का बसला असून तिने घराच्या बाहेर निघणेही बंद केले आहे. या प्रकरणी मुलीच्या कुटुंबाने बुधवारी महात्मा फुले पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली. न्यायालयाने संतोष पाटील यास एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. 

पीडित मुलगी आपल्या कुटुंबासह कल्याण पश्चिम चिकणघर परिसरात राहते. या तरुणीचा विवाह भिवंडी काल्हेर गावात राहणार्‍या संतोष पाटील या तरुणाशी ठरला होता. 11 एप्रिल रोजी त्यांचा साखरपुडा झाला होता. तसेच 7 मे ही लग्नाची तारीखही ठरली होती. साखरपुड्याच्या दोन दिवसांनी संतोष व त्याचे कुटुंबीय मुलीच्या घरी आले. त्यांनी साखरपुड्यात तरुणीला दिलेले दागिने बहाणा करत परत नेले. त्यानंतर काही दिवसांनी त्यांनी तरुणीच्या घरी फोन करत रोकड, गाडी व सोने असे मिळून एकूण 10 लाख रुपयांची मागणी केली.