Thu, Feb 21, 2019 11:46होमपेज › Mumbai-Thane-Raigad › पती-पत्नीचे भांडण बहिणीच्या जिवावर

पती-पत्नीचे भांडण बहिणीच्या जिवावर

Published On: Feb 05 2018 1:47AM | Last Updated: Feb 05 2018 1:03AMभिवंडी : वार्ताहर

पती-पत्नीच्या भांडणात मध्यस्थी करायला गेलेल्या विधवा बहिणीची भावानेच चाकू खुपसून हत्या केल्याची धक्कादायक घटना भिवंडी शहरातील कमतघर भाग्यनगर या परिसरात शनिवारी रात्री घडली. तिपम्मा सोनू शिंदे (50) असे मृत महिलेचे नाव असून पतीच्या निधनानंतर ती भाऊ लक्ष्मण कुर्‍हाडे यांच्या भाग्यनगर येथील घरीच राहत होती. याप्रकरणी लक्ष्मण याला पोलिसांनी रविवारी दुपारी अटक केली. 

शनिवारी रात्री बिगारी कामावरून दारू पिऊन आलेल्या लक्ष्मणचे पत्नी अक्काबाई हिच्यासोबत भांडण झाले. यावेळी लक्ष्मणने पत्नीवर चाकू उगारला असता तेथे उपस्थित तिपम्मा भांडण सोडवण्यासाठी मध्यस्थी करण्यास गेली. मात्र, दारूच्या नशेत तर्रर्र असलेल्या लक्ष्मणने आपल्या हातातील चाकू बहिण तिपम्मा हिच्या पोटात खुपसला. या हल्ल्यात रक्तबंबाळ झालेल्या तिपम्मा हिला कामतघर येथील निरामय रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, तिची प्रकृती गंभीर असल्याने डॉक्टारांनी तिला उपजिल्हा रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला असतानाच तिचा वाटेत मृत्यू झाला. 

या घटनेनंतर कुटुंबीयांनी तिपम्माचे शव सरळ घरी आणून घरातील रक्ताचे डाग साफ करून मृतदेहावर परस्पर अग्निसंस्कार करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु शेजार्‍यांच्या समजविण्यानंतर लक्ष्मणचा मोठा मुलगा संतोष याने शहर पोलीस स्टेशन येथे जाऊन आपल्या पित्याने केलेल्या हत्येची माहिती दिली. यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिनेश कटके व त्यांचे पोलीस कर्मचारी यांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत पंचनामा करून जाब जबाब नोंदवला. तसेच तिपम्माचा मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवत हत्येचा गुन्हा दाखल केला. 
या घटनेनंतर लक्ष्मण फरार झाला होता. मात्र, रविवारी दुपारी पोलिसांनी त्याला अटक केली. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.