Thu, Apr 25, 2019 05:45होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ‘ओखी’चा मुंबईलाही धोका

‘ओखी’चा मुंबईलाही धोका

Published On: Dec 03 2017 1:06AM | Last Updated: Dec 03 2017 12:38AM

बुकमार्क करा

मुंबई : प्रतिनिधी

तामिळनाडू आणि केरळमध्ये हाहाकार उडवणारे ओखी चक्रीवादळ आता अरबी समुद्रात घोंगावत आहे. यामुळे मुंबईलगतच्या समुद्रकिनार्‍यावर धोका निर्माण झाला असून 4 आणि 5 डिसेंबरला मच्छीमारांनी मासेमारीसाठी समुद्रात जाऊ नये, असा इशारा हवामान तज्ज्ञांनी दिला आहे. 

ओखी चक्रीवादळ सध्या मुंबईलगत अरबी समुद्रात दक्षिणेकडे 1000 कि. मी. वर स्थिर आहे. 6 डिसेंबरपर्यंत या वादळाची तीव्रता कमी होत ते पुढे सरकेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र या चक्रीवादळामुळे कोकण किनारपट्टीत समुद्र खवळलेला राहणार आहे. त्यामुळे 4 आणि 5 डिसेंबर या दोन दिवशी समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नये. मुंबईच्या आसपास असणार्‍या डहाणू, पालघर, अलिबाग, उरण आदी परिसरात लहान बोटींनीसुद्धा समुद्रात जाऊ नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. 

या चक्रीवादळाने दक्षिणेत अक्षरश: तांडव घातले असून 130 किलोमीटरच्या वेगाने वादळी वारे वाहत आहेत. शेकडो मच्छीमारांचा अद्याप ठावठिकाणा लागलेला नाही. बेपत्ता मच्छीमार व नौकांच्या शोधासाठी लष्कराची मदत घेतली जात आहे. पावसाचा जोरही कायम आहे.

अरबी समुद्रात स्थिरावलेल्या ओखी वादळाचा मुंबईसह राज्याच्या किनारपट्टीला धोका असल्याचा इशारा हवामान खात्याने दिल्यानंतर सरकारी यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. 24 तास लक्ष ठेवण्यात येत असुन या वादळाची दिशा कशी रहाणार याकडे हवामान खाते डोळ्यात तेल घालून नजर ठेऊन आहे. याची माहिती राज्य सरकारला त्याचप्रमाणे पोलीस नियंत्रण कक्षाला देण्यात येत आहे. महापालिका, पोलिस खात्याला दक्ष ठेवण्यात आले आहे.

मुंबईसह सागरी किनार्‍यांवर 4 तारखेला अंशत: तसेच 5 तारखेला पावसाचीही स्थिती राहू शकते. 5 तारखेला मुंबई, कोकणात सागरी भागात वार्‍यांची तीव्रता अधिक असेल. त्यादृष्टीने नागरिकांनी सतर्क असावे. यामुळे किमान तापमानात वाढ होईल आणि थंडी काही प्रमाणात कमी होईल, अशी माहिती राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली आहे.