Thu, Jun 27, 2019 02:01होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबई : भारतात पहिल्यांदाच पेंग्विनचा जन्म (Video)

मुंबई : भारतात पहिल्यांदाच पेंग्विनचा जन्म (Video)

Published On: Aug 16 2018 11:09AM | Last Updated: Aug 16 2018 11:15AMमुंबई  : प्रतिनिधी 

तमाम मुंबईकर भायखळ्याच्या राणीच्या बागेतील नवा पाहुणा कधी येणार याची आतुरतेने वाट पाहत होता. पेंग्विनने अंडे दिल्यापासून मुंबईकर नव्या पाहुण्याची वाट पाहत होते. अंड्याचा इनक्युबेशन काळ संपताच गोंडस बाळ जन्माला आल्याने मुंबईकरांची प्रतिक्षा संपली. 

भारतात पहिल्यांदाच पेंग्विनचा जन्म झाला. त्यामुळे राणीच्या बागेत सध्या नव्या पाहुण्याच्या स्वागतासाठी बागेतील सर्व कर्मचारी गुंतले असून डॉक्टरांची टीमही २४ तास लक्ष ठेवून आहे. पेंग्विनने अंडे दिल्यानंतर ४० दिवसांनी अंडय़ातून पिल्लू बाहेर आले. हा इन्क्युबेशन पिरिएड संपताच पेंग्विनचा जन्म झाला. अंडे दिल्यापासून फ्लिपर मादी डोळ्यात तेल घालून अंडय़ाची काळजी घेत होती. शिवाय राणीच्या बागेतील डॉक्टर पेंग्विनवर लक्ष ठेवून होते. वीर जिजामाता भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालयात दोन वर्षांपूर्वी २६ जुलै २०१६ रोजी हम्बोल्ट पेंग्विन आणण्यात आले आहेत. पेंग्विनचे बाळंतपण सुखरूप होण्यासाठी डॉक्टरांकडून विशेष काळजी घेतली. 

फ्लिपर मादीने अंडे दिल्यानंतर स्वतः आई आणि बाबा मोल्ट अंडय़ाला आळीपाळीने ऊब देऊन काळजी घेत होते. नैसर्गिकरीत्या उब दिली जात असल्यामुळे डॉक्टरही यावर विशेष लक्ष ठेवून होते. आई पेंग्विन आणि बाळ दोघेही सुखरुप असल्याचे डॉ. संजय त्रिपाठी यांनी सांगितले. डॉक्टरांची टीम त्यांच्यावर लक्ष ठेवून  आहेत.