Mon, Nov 19, 2018 12:34होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मानवी तस्करी : श्रीलंकन दलालास अटक

मानवी तस्करी : श्रीलंकन दलालास अटक

Published On: Jun 16 2018 1:30AM | Last Updated: Jun 16 2018 1:04AMमुंबई : प्रतिनिधी

मानवी तस्करीप्रकरणी एका श्रीलंकन नागरिकाला बुधवारी छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर सहार पोलिसांनी अटक केली. मोईउद्दीन मोहम्मद फयाज असे या आरोपीचे नाव असून त्याच्या तावडीतून तीन तरुणींची सुटका करण्यात आली आहे. 

20 ते 21 वयोगटातील या तरुणी मूळच्या भूतानच्या रहिवासी असून त्यांची इराक येथे स्पा मसाजच्या नावाने तस्करी केली जाणार होती. याची माहिती भूतान दूतावास अधिकार्‍यांना कळविण्यात आली आहे. लवकरच त्यांना त्यांच्या मायदेशात पाठविण्यात येणार आहे. अटकेनंतर मोईउद्दीनला अंधेरीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले. यावेळी त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. मोईउद्दीन फयाज हा श्रीलंका येथील कोलंबोचा रहिवासी असून काही दिवसांपूर्वीच तो मुंबईत आला होता. बुधवारी तो भूतानच्या तीन तरुणीसह छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर आला. या तरुणींची इराक येथे मसाजच्या नावाने मानवी तस्करी होणार होती. विमानतळावर त्या तरुणींना सोडून मोईउद्दीन हा विमानतळाबाहेर गेला. या तरुणींच्या पासपोर्टबाबत संशय निर्माण झाल्याने त्यांना तेथील अधिकार्‍यांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौकशीत मोईउद्दीनचे नाव समोर आले. त्यानंतर या अधिकार्‍यांनी सहारा पोलिसांच्या मदतीने तेथून गेलेल्या मोईउद्दीनला ताब्यात घेतले. 

चौकशीत त्यानेच भूतानमधील काही महिलांच्या मदतीने या तरुणींचे बोगस पासपोर्ट बनविल्याचे उघडकीस आले. त्यांना इराकला पाठविण्यासाठी त्याला काही पैसे मिळाले होते. हा मानवी तस्करीचा प्रकार असल्याचे उघडकीस येताच त्याच्याविरुद्ध सहारा पोलिसांनी विविध भादंवी कलमांतर्गत गुन्हा नोंदविला. याच गुन्ह्यांत त्याला पोलिसांनी अटक केली. मोईउद्दीन हा एजंट म्हणून काम करीत असून त्याने अशाच प्रकारे काही तरुणींसह महिलांना आखाती देशात नोकरीचे आमिष दाखवून पाठविल्याचा संशय आहे. त्याच्या ताब्यातून तिन्ही तरुणींची पोलिसांनी सुटका केली. त्या तरुणी मूळच्या भूतानच्या रहिवासी असून नोकरीसाठी त्यांना एका महिलेने सहा हजार रुपये दिले होते. 

इराकमध्ये स्पा मसाजमध्ये जास्त पगार मिळत असल्याचे आमिष त्यांना दाखविणयात आले होते. सहा महिने प्रशिक्षण दिल्यानंतर तिथे कायमस्वरुपी नोकरी मिळेल. तसेच त्यांना चांगला पगार दिला जाईल, असे सांगण्यात आले होते. भूतान येथून श्रीलंका आणि नंतर मुंबईत आणल्यानंतर त्यांना इराक येथे पाठविण्यात येणार होते. त्यांची माहिती भूतान दूतावास अधिकार्‍यांना देण्यात येणार असून लवकरच त्यांना मायदेशात पाठविण्यात येईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले.