Sun, Apr 21, 2019 05:47



होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ७२ हजार नोकर्‍या कशा देणार?

७२ हजार नोकर्‍या कशा देणार?

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा





मुंबई : विशेष प्रतिनिधी

लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र घेण्याबाबत दिल्लीत खलबतं सुरू झाल्यापासून राज्यातील भाजपा नेत्यांनी शिवसेनेशी जुळवून घेण्याचा प्रयत्न सुरू केला असला तरी दूध प्याल्याने तोंड पोळलेली शिवसेना आता ताकही फुंकून पिऊ लागली आहे. गेल्या तीन वर्षांपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणांचा सपाटा लावला आहे. यापैकी एकाही घोषणेची पूर्तता झाली नसताना आता त्यांनी 72 हजार तरुणांना नोकर्‍या देण्याची घोषणा केली आहे. या घोषणेचीही पूर्तता होणार नाही, असा विश्‍वास असलेल्या शिवसेनेने सरकारला थापा मारायला चांगलेच जमतंय, अशी मार्मिक टिपणी शिवसेनेने आपल्या मुखपत्रातून केली आहे.

राज्यात फडणवीसांचे सरकार विराजमान झाले तेव्हा पुढील पाच वर्षांत 20 लाख रोजगार, पोलीस व गरिबांना घरे, शेतकर्‍यांना कर्जमुक्तीची घोषणा केली होती. पण यापैकी एकही घोषणा प्रत्यक्षात आली नाही. कर्जमुक्ती झालेल्या शेतकर्‍यांची यादी जाहीर करा अशी मागमी करूनही सरकार टाळाटाळ करत आहे. सरकार केवळ बोलत असून करत काही नाही. थापा मारून वेळ काढायचा हे तंत्र नव्या सरकारला चांगलेच जमते. त्यामुळे 72,000 नोकर्‍या कशा देणार, असा सवालही शिवसेनेने उपस्थित केला आहे.

वर्षभरात 36 हजार सरकारी नोकरभरती होणार असली तरी 11 कोटींच्या महाराष्ट्रात लाखो तरुण बेकार आहेत. राज्यातील बेरोजगारीचे संकट वाढले आहे. मुंबई-महाराष्ट्रातील उद्योग बाहेर पळवले जात आहेत. या पळवापळवीत महाराष्ट्राची आर्थिक पीछेहाट होत आहे. सरकारी नोकरभरतीस मर्यादा आहेत. लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षा होऊनही नोकरभरती होत नसल्याने तरुणवर्ग मधल्या काळात रस्त्यावर उतरला होता. तेव्हाही सरकारी नोकरभरतीवरील निर्बंध उठवण्याचे आश्‍वासन देण्यात आले.  विधानसभा व लोकसभा निवडणुकांआधी ही सर्व भरती करून घेण्याचा मुहूर्त मुख्यमंत्र्यांनी शोधला आहे. चिंता मुहूर्ताची नसून घोषणेच्या अंमलबजावणीची आहे, अशी टीकाही शिवसेनेने केली आहे.






  •