Wed, Nov 14, 2018 23:12होमपेज › Mumbai-Thane-Raigad › राज्य पोलीस दलात ‘मराठा’ अधिकारी किती?

राज्य पोलीस दलात ‘मराठा’ अधिकारी किती?

Published On: Aug 01 2018 1:31AM | Last Updated: Aug 01 2018 1:24AMनवी मुंबई : राजेंद्र पाटील 

गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मराठा आंदोलनाचा परिणाम म्हणा किंवा राज्य सरकारने चालवलेल्या पाठपुराव्याचे यश... मराठा आरक्षणाच्या प्रस्तावावर राज्य मागास वर्ग आयोगाने हालचाली करण्यास सुरुवात केलेली दिसते. 

राज्य पोलीस दलात खुल्या प्रवर्गात मराठा समाजातील किती पोलीस उपअधीक्षक ( ग्रामीण) आणि सहायक पोलीस आयुक्त ( शहरे) कार्यरत आहेत, याची माहिती राज्य सरकारने संबंधित घटक प्रमुखांकडून मागवली असून, ही माहिती राज्य मागासवर्ग आयोगास सादर करावयाची असल्याचे पत्रात स्पष्ट नमूद आहे. 

पोलीस महासंचालक कार्यालयाला गृहविभागाने (रापोसे-2218/प्र.क्र.44/पोल 1अ) 20 जुलै रोजी पाठवलेल्या पत्राची दखल  घेत अपर पोलीस महासंचालक ( आस्थापना) संदीप बिश्‍नोई यांनी मुंबई पोलीस आयुक्तांसह सर्व पोलीस आयुक्त आणि 36 पोलीस अधीक्षकांना ही माहिती 25 जुलै बुधवारपर्यंत पाठविण्याच्या सूचना केल्या आहेत. अशीच माहिती इतर खात्यांकडूनही मागवण्यात आली असण्याची शक्यता एका वरिष्ठ अधिकार्‍याने वर्तवली. 

राज्यातील 37 हून अधिक खात्यांकडून सामान्य प्रशासन विभागाकडून अ वर्गात मोडणार्‍या अधिकार्‍यांची जातनिहाय माहिती मागविण्यात आल्याचे सूत्रांनी पुढारीला सांगितले. प्रत्येक खात्यात मराठा अधिकारी किती याची  मोजदाद प्रशासन आता करू लागले आहे. अर्थात त्यास निमित्त ठरला तो राज्य मागासवर्ग आयोग. राज्य पोलीस दलात 16 हजार अधिकारी कार्यरत आहेत. त्यापैकी सुमारे अडीच ते तीन हजार सहायक पोलीस आयुक्त असण्याची शक्यता आहे. आता या अधिकार्‍यांची सेवापुस्तिका तपासणी करुन ते मराठा असल्याचे पाहूनच तसा अहवाल पाठवला जाईल.