Mon, Apr 22, 2019 03:54होमपेज › Mumbai-Thane-Raigad › नवी मुंबईत 20 भूखंडांवर गृहनिर्माण प्रकल्प

नवी मुंबईत 20 भूखंडांवर गृहनिर्माण प्रकल्प

Published On: Aug 29 2018 1:43AM | Last Updated: Aug 29 2018 1:43AMनवी मुंबई : प्रतिनिधी

नवी मुंबईतील सिडकोच्या तब्बल 20 भूखंडांवर गृहनिर्माण संस्थांना प्रकल्प उभारण्यासाठी लवकरच सोडत काढली जाणार आहे. राज्यातील शासकीय, निमशासकीय, केंद्रीय कर्मचार्‍यांसह खासगी संस्थांनी सिडकोकडे घरे बांधण्यासाठी भूखंडाची मागणी केली होती. राज्यातून तब्बल 170 गृहनिर्माण संस्थांनी सिडकोकडे अर्ज केले असून त्यापैकी 146 संस्था पात्र ठरल्या आहेत.तर 24 संस्थांचे प्रस्ताव फेटाळण्यात आले. या भूखंड विक्रीतून सिडकोच्या तिजोरीत  सुमारे 100 कोटी रुपयांचा महसूल जमा होणार आहे. 

नवी मुंबईतील घणसोली, खारघर, कळंबोली, तळोजा, द्रोणागिरी या भागात सिडकोने 14 हजार 838 घरांसाठी लॉटरी जाहीर केली आहे. याचे अर्ज ऑनलाईन भरण्याची प्रक्रिया सुरू असतानाच आता सिडकोने सिडको गृहनिर्माण संस्था भूखंड योजना 2017 ची लवकरच सोडत काढणार असल्याचे जाहीर केले आहे. 

नवी मुंबईतील पनवेल, नेरूळ, खारघर, कळंबोली, सानपाडा, घणसोली या नोडमधील 20 भूखंड प्रस्तावित गृहनिर्माण संस्थांकरिता उपलब्ध करून देण्यात आले होते. हे भूखंड 1500 ते 4 हजार चौ. मी  क्षेत्रफळाचे असून एका भूखंडाची किमत सुमारे 5 कोटी रुपये आहे. स्वातंत्र्यसैनिक, राज्य शासन कर्मचारी, केंद्रीय कर्मचारी, अनुसूचित जाती व जमाती, पत्रकार, लोकप्रतिनिधी इ. प्रवर्गांतर्गत काही भूखंड राखीव ठेवण्यात आले होते. यामध्ये जनरल चार भूखंड, सरकारी कर्मचारी 4 आणि केंद्रीय कर्मचारी 1 अशा पध्दतीने गृहनिर्माण भूखंडांचे वाटप होणार आहे. या योजनेच्या सोडतीकरिता पात्र  व अपात्र ठरलेल्या गृहनिर्माण संस्थांची यादी सिडकोच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली असून पात्र ठरलेल्या गृहनिर्माण संस्थांकरिता काढण्यात येणार्‍या सोडतीचे ठिकाण व तारीख लवकरच जाहीर केली  जाणार आहे. पात्र ठरलेल्या गृहनिर्माण संस्थांचे केवळ मुख्य प्रवर्तक किंवा त्यांचे प्रतिनिधी सोडतीस उपस्थित राहू किंवा सहभागी होऊ शकतील, असे सिडकोकडून सांगण्यात आले.