Thu, Apr 25, 2019 15:29होमपेज › Mumbai-Thane-Raigad › महामुंबई प्रदेशात ८६ हजार सदनिका पडून

महामुंबई प्रदेशात ८६ हजार सदनिका पडून

Published On: Mar 07 2018 2:09AM | Last Updated: Mar 07 2018 1:35AMमुंबई : पुढारी वृत्तसेवा

गृहबांधणी व्यवसाय त्यातील नफ्याच्या प्रचंड प्रमाणामुळे एकेकाळी सोन्याची अंडी देणारी कोंबडी म्हणून ओळखला जायचा. मात्र आता मंदीमुळे ही कोंबडी घायकुतीला आली आहे. भारतातील महत्त्वाच्या शहरांत 4 लाख 40 हजार सदनिका विक्रीविना पडून आहेत. त्यातील एकट्या मुंबई महानगर विभागात विक्री न झालेल्या सदनिकांची संख्या 86 हजार 296 इतकी आहे. जेएलएलने केलेल्या सर्वेक्षणात ही आकडेवारी उघडकीस आली आहे.  

राजधानी दिल्‍लीच्या परिसरात विक्रीविना पडून असलेल्या सदनिकांची संख्या 1 लाख 50 हजार 654 इतकी प्रचंड आहे. 2017 साली देशातील हे सर्वोच्च प्रमाण आहे. 

मुंबई महानगर क्षेत्रात ठाणे शहरात विक्रीविना पडून असलेल्या सदनिकांची संख्या सर्वात कमी असून यातील 12 हजार 500 सदनिका अंडर कन्स्ट्रक्शन तर 163 बांधून पूर्ण झाल्या आहेत. दर्जेदार बांधकाम, चांगल्या वाहतूक सुविधा, सामाजिक पायाभूत सुविधांत होत असलेल्या सुधारणा यांमुळे ठाणे शहराला घरांसाठी खरेदीदारांची अधिक पसंती मिळत आहे. 

नवी मुंबईत विक्री न झालेल्या सदनिकांची संख्या 24 हजारहून अधिक आहे. यातील केवळ 2 हजार 654 सदनिका बांधून पूर्ण झाल्या आहेत. यातील बहुसंख्य सदनिका या खारघर आणि पनवेल येथे आहेत. हा भाग गुंतवणूकदारांचा म्हणून ओळखला जातो. 

मुंबईत विनाविक्री सदनिकांची संख्या 50 हजार इतकी आहे. त्यातील बहुसंख्य हे अंडर कन्स्ट्रक्शन आहेत. प्रकल्प पूर्णत्वाकडे आले की विक्रीचा वेग वाढेल, अशी व्यावसायिकांना आशा आहे. मुंबईपाठोपाठ पुणे सर्वच बाबतीत झपाट्याने वाढत आहे. बांधकाम व्यवसायासाठी ते महत्त्वपूर्ण शहर आहे. पुण्यात विक्रीविना असलेल्या सदनिकांची संख्या 36 हजार इतकी असून, त्यातील 500 सदनिका बांधून पूर्ण झाल्या आहेत. किमतींच्या बाबतीत पुणे खूपच संवेदनशील आहे. विक्री न झालेल्या बहुसंख्या सदनिका पुण्याबाहेर असून त्या विशेषत्वाने गुंतवणूकदारांसाठी बांधण्यात आल्या आहेत.