होमपेज › Mumbai-Thane-Raigad › गृहिणींच्या कामाला रोजगाराच्या दर्जाचा विचार

गृहिणींच्या कामाला रोजगाराच्या दर्जाचा विचार

Published On: Aug 08 2018 1:50AM | Last Updated: Aug 08 2018 1:50AMमुंबई : पुढारी वृत्तसेवा

देशातील रोजगाराच्या वास्तव स्थितीवर प्रकाश टाकण्यासाठी कोणताही मोबदला मिळत नसलेल्या महिलांच्या घरगुती कामासही रोजगाराचा दर्जा देण्याबाबत सरकार विचार करत आहे. याअनुषंगाने महिलांकडून केल्या जाणार्‍या घरातील कामाचे मूल्यमापन केले जाणार आहे. यासंदर्भात सरकारने जानेवारीपासून एक वर्षभर सर्वेक्षण करण्याचे ठरवले असून गृहिणी आपल्या घरात कशाप्रकारे दिवस घालवतात, याबाबत जाणून घेतले जाणार असल्याची माहिती नॅशनल सँपल सर्व्हे कार्यालयाचे महानिरिक्षक देवी प्रसाद मंडल यांनी एका मुलाखतीदरम्यान दिली. 

यासंदर्भातील ब्लूमबर्गच्या आहवालानुसार, या सर्व्हेक्षणाचा अहवाल जून 2020 मध्ये जाहिर केला जाणार असून प्रत्येक तीन वर्षांनी अशा प्रकारचे सर्व्हेक्षण केले जाणार आहे. स्वयंपाक करणे, कपडे धुणे यासारख्या कामांसाठी महिलांना किती वेळ द्यावा लागतो याबाबतची माहिती मिळवणे यामुळे शक्य होणार आहे. परिणामी आपल्या अर्थव्यवस्थेत रोजगाराची स्थिती काय आहे तसेच विकास कार्यक्रम कशा प्रकारे राबवले जावू शकतात, याबाबत निर्णय घेण्यास संबंधितांना मदत होवू शकते, असेही मंडल यांनी सांगितले. 

जगात वेगाने वाढणार्‍या अर्थव्यवस्थांमध्ये भारतीय अर्थव्यवस्थेचा समावेश होतो. असे असले तरी विविध क्षेत्रांमध्ये रोजगाराची स्थिती काय आहे याबाबत स्पष्ट माहिती पुढे येत नाही. विशेषत: मार्केट, रिटेल तसेच हौसिंग क्षेत्रात तर याबाबत माहितीच मिळत नाही. 

भारतातील सुमारे 70 टक्के म्हणजे अमेरिकेच्या दुप्पट लोकसंख्या प्रत्यक्ष कामकाजाचा हिस्साच नाही. महिलांचाच विचार करायचा झाला तर घरात केली जाणारी कामे राष्ट्रीय उत्पन्नाचा भाग मानली जात नाहीत.