Fri, Aug 23, 2019 21:19होमपेज › Mumbai-Thane-Raigad › हॉटेलचे पार्सल 20 ते 25 टक्क्यांनी महागणार

हॉटेलचे पार्सल 20 ते 25 टक्क्यांनी महागणार

Published On: Jun 28 2018 1:33AM | Last Updated: Jun 28 2018 1:06AMमुंबई : प्रतिनिधी

हॉटेलचालक-मालकांची आहार संघटना आणि बीएमसी प्रशासनामध्ये जेवणाच्या पार्सल कंटेनरवरून वाद निर्माण झाला आहे. पुनर्वापर आणि पुनर्प्रक्रिया होणार्‍या पार्सल कंटेनरवर मनपा निरीक्षक छापे टाकून कारवाई करत असल्याचा आरोप आहार संघटनेचे अध्यक्ष संतोष शेट्टी यांनी केला आहे. पालिकेने सुचवलेले पर्यायी कंटेनर हे पार्सल साठी योग्य नसल्याचाही आरोप त्यांनी केला. शिवाय पुनर्वापर होणार्‍या कंटेनरची किंमत सुद्धा अधिक असल्याने त्याचा थेट परिणाम जेवणाच्या पार्सलवर होऊन पार्सल जवळपास 20 ते 25 टक्क्यांनी महागणार आहे.

प्लास्टिकबंदीचा निर्णय हा स्वागतार्ह आहे. आणि त्याला इंडियन हॉटेल अ‍ॅण्ड रेस्टॉरंट असोसिएशन (आहार) चा पाठिंबा आहे. मात्र सर्व प्रकारच्या प्लास्टिक पिशवी बंद  झाल्याने हॉटेलमधून खाद्यपदार्थ पार्सल करण्यासाठी पर्याय म्हणून महापालिकेच्या जीआरनुसार इंजेक्शन मोल्डींग प्लास्टिक कन्टेनरचा वापर करण्यात येत आहे. तसेच या निर्णयानंतर आम्ही सर्व हॉटेल्सना प्लास्टिक पिशव्या बंद करून पुन्हा वापरात येऊ शकतील असे  कंटेनर वापरण्याचे आदेश दिल्याचे त्यांनी वडाळा येते घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. 

अधिकार्‍यांना कोणते प्लास्टिक बंद आहे कोणते नाही याची माहिती नसल्याने ते पुनर्वापर होणार्‍या प्लास्टिकवरही कारवाई करत आहेत. ही कारवाई अशीच होत राहिली, तर आम्ही कोणत्याही प्रकारचा दंड भरणार नाही, पालिकेने नेमलेल्या पथकांनी चेंबूर येथील तीन हॉटेलवर कारवाई केली आहे. ही कारवाई अत्यंत चुकीची असून कोणत्या प्रकारच्या प्लास्टिक वस्तूंवर कारवाई करण्यात यावी याबतची माहिती त्यांना पालिकेच्या वरिष्ठ अधिका़र्‍यांनी द्यावी. अन्यथा येथून पुढे आशा चुकीच्या कारवाईचा दंड हॉटेलमालक भरणार नाहीत. पंचनामाची प्रत घेऊन न्यायालयात धाव घेऊन या चुकीच्या कार्य पद्धतीचा सामना करू असे असोसिएशनचे जनरल सेक्रेटरी विश्वापाल शेट्टी यांनी पुढारीशी बोलताना सांगितले.

पालिकेने प्लास्टिक डब्याला सुचवलेल्या झाडांपासून तयार केलेल्या कंटेनरमधून पार्सल देणे अशक्य आहे. गरम पदार्थ त्या डब्यात टाकताच थोड्या वेळातच तो डबा सैल होऊन पदार्थ सांडला जातो. तीन महिन्यांपासून आम्ही पुनर्वापर होऊ शकेल अशा कंटेनरचा वापर करत आहोत. कोणत्याही अन्नपदार्थांची किंमत जरी वाढणार नसेल, तरी मात्र ग्राहकांना सांबार, करी, मिसळ यांसारखे द्रव पदार्थ पार्सल देताना तीन तीन कंटेनर द्यावे लागतात. परिणामी त्या कंटेनरसाठीची किंमत ग्राहकांकडूनच वसूल करण्यात येणार असल्याचे आहारचे अध्यक्ष संतोष शेट्टी यांनी सांगितले.