Thu, Apr 25, 2019 11:28होमपेज › Mumbai-Thane-Raigad › इंग्रजी अभ्यासक्रम न समजल्यामुळे मराठी विद्यार्थ्यांची घरवापसी!

इंग्रजी अभ्यासक्रम न समजल्यामुळे मराठी विद्यार्थ्यांची घरवापसी!

Published On: Apr 30 2018 1:44AM | Last Updated: Apr 30 2018 1:27AMमुंबई : प्रतिनिधी

पाल्याला इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये घालणार्‍या अनेक कष्टकरी पालकांनी आता पुन्हा एकदा आपल्या पाल्यांसाठी मराठी माध्यमाच्या शाळेत प्रवेश घेण्यास सुरुवात केली आहे. दुसरी-चौथी-पाचवीपर्यंत इंग्रजी शाळेत शिकूनही पाल्यांना इंग्रजी अभ्यासक्रम समजत नसल्याचे स्पष्ट झाल्यामुळे अनेक पालक हवालदिल झाले आहेत. धारावी, सायन, चुनाभट्टी परिसरातील अशा तब्बल 40 पालकांनी यंदा आपल्या पाल्याचे नाव इंग्रजी शाळेतून काढून सायन येथील शिव शिक्षण संस्थेच्या डी. एस. हायस्कूल या मराठी शाळेत घातले असल्याची माहिती शाळेने दिली आहे.

धारावीत राहणार्‍या व परिसरातील इमारतींमध्ये घरकाम करून उदरनिर्वाह करणार्‍या एका पालकाने आपल्या मुलीला तेजस्वी (नाव बदलले आहे) ला एका नावाजलेल्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घातले होते. मात्र तिसरीत गेल्यानंतरही तिला शाळेचा अभ्यास न जमल्यामुळे तिचे प्रगतीपुस्तक लाल शेर्‍यांनी भरून येत होते. घरात मराठी आणि शाळेत इंग्रजी, या कोंडीत तेजस्वी सापडली होती. इंग्रजीतून तिचा गृहपाठ घेणे पालकांना  जमत नव्हते तर खासगी शिकवणी लावण्यासाठी आणखी पैसे मोजणेही त्यांना परवडणारे नव्हते. इंग्रजी माध्यमाच्या शाळेत विद्यार्थीनी गप्पगप्प राहू लागली. शिक्षिका तिच्याविषयी तक्रार करू लागल्या. अखेर पालकांनी इंग्रजी माध्यमाच्या शाळेतून काढले आणि मराठी माध्यमाच्या शाळेत इयत्ता तिसरीत तिचे नाव नोंदवले आहे. अशी माहिती डी. एस. हायस्कूलच्या मुख्याध्यापिका शीला देशपांडे यांनी दिली. चौथीत राधिका, दुसरीतली साक्षी आणि पाचवीतला राहुल यांच्या बाबतसुद्धा असेच घडले आहे. (सर्व नावे बदलली आहेत)

डी. एस. शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक पालकांशी-विद्यार्थ्यांशी सविस्तर चर्चा करतात. सुरुवातीच्या काळात त्यांच्याकडे विशेष लक्ष दिले जाते. त्यांना मराठी संपूर्ण समजत असतेच प्रश्न असतो तो फक्त लिहिण्याचा मात्र शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे तीन-चार महिन्यांतच असे विद्यार्थी मराठी वाचायला आणि लिहायला शिकतात. मातृभाषेत शिकल्यामुळे त्यांना सर्व विषयांमधल्या संकल्पनाही शाळेतच समजतात व खासगी शिकवणी लावण्याची अजिबात गरज भासत नसल्याचे विश्‍वस्त प्रधान यांनी सांगितले.

इंग्रजी माध्यमाची शाळा हीच जणू आपल्या मुला-मुलीचं भवितव्य उज्ज्वल बनवू शकते, असा ठाम समज कष्टकरीवर्गात आता दृढ झालेला आहे. कसलाही विचार न करता मुलांना इंग्रजी माध्यमात घातले जाते आणि मग मुले तिसरी-चौथी किंवा अगदी सातवीत गेल्यावर शिक्षकांकडून त्यांना कळते की, मुलाला अभ्यास जमत नाही. इंग्रजी शाळेत जाऊनही त्याला इंग्रजी वाक्य लिहिता अथवा बोलता येत नाही. पण प्रत्यक्ष स्थिती काय असते ? पालकांनाच इंग्रजी अजिबात कळत नसल्यामुळे मुलांना इंग्रजीतून शिक्षण घेण्यात अडथळे निर्माण होत असतात त्यामुळे शाळा बदलण्याचा निर्णय पालक घेतात असेही प्रधान यांनी यासंदर्भात माहिती देताना स्पष्ट केले.

Tags : Mumbai, mumbai news,  Marathi student, English syllabus, Homecoming,