Sun, Aug 25, 2019 12:16होमपेज › Mumbai-Thane-Raigad › पोलिसांच्या हक्काचे घर लवकरच साकारणार

पोलिसांच्या हक्काचे घर लवकरच साकारणार

Published On: Apr 11 2018 1:41AM | Last Updated: Apr 11 2018 12:43AMकल्याण : वार्ताहर

शासनाने पोलिसांना हक्काची घरे उपलब्ध करून देण्यासाठी विविध योजनांची घोषणा केली आहे. मात्र, या घरांवर विसंबून न राहता पोलिसांना खासगी विकासकांच्या सहाय्याने स्वस्त दरात घरे उपलब्ध करून देण्यासाठी पोलीस दलातील वरिष्ठ अधिकार्‍यांनी ठोस पावले उचलत गृहप्रकल्प उभारण्यासाठी प्रयत्नशील राहणे आवश्यक आहे.असे प्रतिपादन पोलीस महासंचालक सतीश माथूर यांनी केले. टिटवाळा येथील पोलिसांसाठीच्या गृह प्रकल्पाच्या भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते.

ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात पोलिसांसाठी घरे तयार होत आहे. या इमारतींच्या रेडिरेकनरचे दर कमी करण्यासंदर्भात किंवा नोंदणी शुल्क आणि स्टॅम्प ड्युटीमध्ये सवलत मिळावी यासाठी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असून, दर कमी न केल्यास पोलीस वेल्फेअर फंडातून ही फरकाची रक्कम कर्जाच्या स्वरूपात दिली जाईल. मात्र कोणत्याही परिस्थितीत पोलिसांचे हक्काच्या घराचे स्वप्न साकार केले जाईल, असे आश्वासन  सतीश माथुर यांनी यावेळी दिले.

ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक परीक्षेत्रातील टिटवाळा पोलीस ठाणे तथा कल्याण तालुका ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बल्याणी, मोहने रोड, टिटवाळा पूर्व येथे ठाणे ग्रामीण पोलीस दल व साई मल्हार बिल्डर्स, आई डेव्हलपर्स यांच्या संयुक्त विद्यमाने साई कान्हु पोलीस संकुलाचा भूमिपूजन सोहळा मंगळवारी पोलीस महासंचालक सतीश माथुर यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी कोकण परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक नवल बजाज यांच्यासह ठाणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक महेश पाटील, रायगडचे पोलीस अधीक्षक अनिल पारसकर, रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक गणेश अशोक, सिंधुदुर्गचे पोलीस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम यांच्यासह विकासक आणि ठाणे ग्रामीणमधील पोलीस कर्मचारी, कुटुंबीय उपस्थित होते.

पोलिसांना शासनाकडून घरे देण्याचे आश्वासन देण्यात आले असले तरी सध्या पोलिसांसमोर हक्काच्या घराचा प्रश्न आहे. शासकीय योजनांमधून हक्काची घरे देण्यात अनेक अडचणी येत असल्यानेच कोकण परिमंडळ क्षेत्रात खासगी विकासकाच्या सहाय्याने पोलिसांना स्वस्त दरात घरे उपलब्ध करूण देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आदेश पोलीस महासंचालकांनी दिले होते. त्यानुसार ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात राबविलेल्या योजनेला पोलिसांकडून चांगला प्रतिसाद लाभत आहे. 

Tags : mumbai, mumbai news, Titwala Home Project, Bhumi Pujan, Director General of Police Satish Mathur,