Tue, Jun 02, 2020 04:28
    ब्रेकिंग    होमपेज › Mumbai-Thane-Raigad › गृहमंत्री अनिल देशमुख यांनी बेघर, स्थलांतरीत मजुरांची घेतली भेट 

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी बेघर, स्थलांतरीत मजुरांची घेतली भेट 

Last Updated: Apr 01 2020 5:21PM
मुंबई : पुढारी वृत्तसेवा

लॉकडाऊन व सर्व वाहतूक सेवा बंद झाल्यावर हातवर पोट असणारे गरीब मजूर आपापल्या गावी जाण्यासाठी धडपडू लागले. हे सर्व समूहाने एकत्र येत रस्त्यांवर गावी चालत निघाले तसेच मिळेल त्या वाहनाने जाण्याचा प्रयत्न करु लागले. या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यासर्व मजुरांना, बेघर व्यक्तींना जिथे आहात तिथे थांबण्याचा सल्ला दिला तसेच राज्यशासनाकडून त्यांची सर्वती व्यवस्था करण्याचे आश्वासन दिले. याच पार्श्वभूमीवर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दि. ३१ मार्च रोजी मुंबईच्या भायखळा येथील रिचर्डसन कृडासच्या आवारात असलेल्या बेघर व स्थलांतरीत मजुरांची भेट घेतली. यावेळी त्यांच्या व्यथा आणि अडचणी जाणून घेतल्या. तसेच त्या मजुरांना गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अन्नवाटपही केले. 

अधिक वाचा : 'पाच हजारांहून अधिक जण हाय रिस्क कॉन्टॅक्टमध्ये'

या प्रसंगी गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले, "माझ्याकडून या गरीब जनतेची सेवा होऊ शकली, हे मी आपलं भाग्य मानतो. मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंनी सांगितल्याप्रमाणे राज्यातील कुणीही कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे उपाशी राहणार नाही याची काळजी सरकार घेईल."

अधिक वाचा : केंद्र सरकारवर कर्जाचा डोंगर; सहा महिन्यात ४ लाख ८८ हजार कोटींचे कर्ज घेण्याच्या तयारीत!

ते पुढे म्हणाले, "गरीब, रंजले-गांजले, आदिवासी, रोजंदारी करणारे कामगार कोणत्याही राज्यातील असोत, कोरोना विरूद्धच्या लढाईत त्यांची उपासमार होऊ नये यासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे. जनतेला तसं मी आश्र्वासित करतो."

यावेळी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या की, बेघरांची व स्थलांतरित मजुरांचे तपशील जमा करून लॉकडाऊन संपेपर्यंत या सर्व लोकांची अन्न-पाण्याची, राहण्याची व आरोग्य चाचणीची सोय केली जावी.

अधिक वाचा : 'कोरोना लढ्यात बेजबाबदारपणे वागणाऱ्यांची यापुढे खैर केली जाणार नाही'

देशासह राज्यात लॉकडाऊन सुरु आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून देशभरात हा लॉकडाऊन राबविण्यात येत आहे. यामुळे संपूर्ण देशच खबरादारीचा उपाय म्हणून घरात बसला आहे. पण, लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर तसेच सर्व वाहतूक सेवा बंद झाल्यावर अनेक मजूर, हातवर पोट असणारे गरीब लोक चालत तसेच मिळेल त्या वाहनांच्या सहाय्याने गावी पोहचण्याची धडपड करु लागेले. त्यामुळे अनेक लोकांच्या झुंडी रस्त्यावर आल्याचे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले. यामुळे लोक समुहाने दिसल्यामुळे कोरोनाचा प्रसार होण्याची भीती व्यक्त केली जाऊ लागली. तसेच अनेक लोक राज्यांच्या सीमांवर तसेच जिल्ह्यांच्या सीमांवर येऊन ठेपल्याचे चित्र होते. 

अधिक वाचा : 'कर्जमाफीची रक्कम शेतकर्‍यांच्या खात्यात जमा'

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा घेत सर्व मजूर, गोर-गरिब जनतेला जिथे असाल तिथे थांबण्याचा सल्ला दिला. तसेच राज्य शासनाच्या वतीने या सर्व लोकांची अन्न-पाण्याची, राहण्याची व आरोग्य चाचणीची सोय केली जाईल असे आश्वासन दिले. आता हे स्थलांतरी, बेघर, मजूर लोक जिथे आहेत तिथे थांबले असून त्यांची योग्य ती सोय राज्य शासनाकडून करण्यात येत आहे.