Tue, Jun 25, 2019 13:07होमपेज › Mumbai-Thane-Raigad › हॉली क्रॉस रुग्णालय फोडणारे हल्लेखोर भूमिगत

हॉली क्रॉस रुग्णालय फोडणारे हल्लेखोर भूमिगत

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

डोंबिवली : वार्ताहर

कल्याण पश्चिमेकडील हॉली क्रॉस रुग्णालयात सोमवारी सायंकाळच्या सुमारास मृत रुग्णाच्या नातेवाईकांनी तोडफोड करत डॉक्टर, कर्मचार्‍यांसह वृत्तांकनासाठी गेलेल्या पत्रकारावर जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात 70-80 जणांविरोधात सशस्त्र दंगलीसह विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मात्र हे सर्व हल्लेखोर सध्या भूमिगत असून पोलीस त्यांंचा शोध घेत आहेत.

कल्याण तालुक्यातील वरप गावात राहणारा रोहित भोईर या 22 वर्षीय तरुणाला त्याच्या नातेवाईकांनी रविवारी हृदयविकाराचा झटका आल्याने हॉली क्रॉस रुग्णालयात दाखल केले होते. उपचार सुरू असतानाच उपचारादरम्यान रोहितचा सोमवारी दुपारी 3 च्या सुमारास मृत्यू झाला. या घटनेचे वृत्त बाहेर पडताच संतापलेल्या नातेवाईकांनी डॉक्टरांच्या हलगर्जीपणाने रुग्णाचा मृत्यू झाल्याचा आरोप करत रुग्णालयाची तोडफोड केली. याचदरम्यान रुग्णालयात शेकडो जणांचा जमाव घुसला व या जमावाने रुग्णालयात एकच गोंधळ घातला. 

जमावाने तोडफोड करून रुग्णालयातील अतिदक्षता विभागही फोडला, तसेच औषधांची नासधूस केली. शिवाय डॉक्टर व कर्मचार्‍यांनाही बेदम मारहाण केली. तब्बल दोन ते तीन तास जमावाचा तमाशा सुरू होता. त्यामुळे इतर रुग्णांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. या घटनेचे वृत्तांकन करण्यासाठी गेलेले पत्रकार केतन बेटावदकर यांनाही जमावाने सोडले नाही. हातातील मोबाईल हिसकावून घेत धारदार शस्त्राने केतन यांच्या पायावर सपासप वार केले. यावेळी उपस्थित पोलिसांनी केतनला जमावाच्या तावडीतून सोडवले. हल्ल्यात पत्रकार केतन गंभीर जखमी झाले. उपचारासाठी त्यांना एका खासगी रुग्णालयातील अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले.

रात्री उशिरा पालकमंत्री एकनाथ शिंदे, महापौर राजेंद्र देवळेकर यांनी जखमी  बेटावदकर यांची भेट घेऊन प्रकृतीची विचारपूस केली. हिंसाचाराची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. 

याप्रकरणी म. फुले चौक पोलिसांनी रुग्णालयाची तोडफोड व डॉक्टरसह कर्मचार्‍यांना मारहाण केल्याप्रकरणी 70 ते 80 जणांविरोधात गुन्हा दाखल केला.पत्रकार  बेटावदकर यांच्यावर जीवघेणा हल्ला करणार्‍या 25 ते 30 जणांच्या सशस्त्र जमावावरही गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी रुग्णालयातील सीसीटीव्ही ताब्यात घेत हल्लेखोरांचा शोध सुरू केला आहे.

कठोर कारवाईची मागणी 

पत्रकार बेटावदकर यांच्यावरील हल्ल्याच्या घटनेचा कल्याण-डोंबिवलीतील पत्रकारांनी निषेध व्यक्त केला आहे. त्यानंतर मंगळवारी पत्रकारांनी कल्याण परिमंडळ-3 चे पोलीस उपायुक्त डॉ. संजय शिंदे यांची भेट घेत हल्लेखोरांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. यावेळी डॉ. शिंदे यांनी आरोपींचा लवकरात लवकर शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करणार असल्याचे आश्वासन दिले.