होमपेज › Mumbai-Thane-Raigad › त्याचा जीव जात होता, बघे फोटो काढत होते...!

त्याचा जीव जात होता, बघे फोटो काढत होते...!

Published On: Apr 17 2018 2:26AM | Last Updated: Apr 17 2018 1:53AMकल्याण : वार्ताहर

मोबाईलच्या जमान्यात पावलो पावली माणुसकी हरवल्याचे चित्र हल्ली दिसत असते. याचाच प्रत्यय सोमवारी सकाळी मध्य रेल्वे मार्गावरील शहाड स्थानकाजवळ घडलेल्या एका घटनेने आला. कसार्‍याहून कल्याणच्या दिशेने येणार्‍या रेल्वेमधून शहाड स्थानकाजवळील नाल्यात एक तरुण पडला. त्याला बाहेर काढून मृत्यूच्या मगर मिठीतून वाचविण्याऐवजी बघ्यांनी फोटो आणि व्हिडीओ क्लीप काढण्यात धन्यता मानली. त्यामुळे उपचाराअभावी या तरुणाचा मृत्यू झाला. त्याला वेळीच उपचार मिळाले असते तर या तरुणाचा जीव वाचला असता. याप्रकरणाची महात्मा फुले चौक पोलिसांनी नोंद केली असून पुढील तपास सुरू केला आहे.

शहाड-कल्याण स्थानकाच्या दरम्यान सोमवारी सकाळी 11.30 च्या सुमारास रेल्वेतून दोन तरुण रेल्वे मार्गाशेजारी असलेल्या नाल्यात पडले. त्यापैकी एकाने कसाबसा प्रयत्न करीत नाल्यातून बाहेर येण्यात यश मिळविले. मात्र त्याने दुसर्‍या तरुणाला वाचविण्याचा प्रयत्न केला नाही. त्याने बाहेर येताच तेथून धूम ठोकली. दुसर्‍या तरुणाच्या नाका-तोंडात नाल्यातील घाण पाणी गेले. तो तरुण अंबिका नगर परिसरातील रोडच्या बाजूला असलेल्या नाल्यात वाहून आला. याचवेळी आजूबाजूच्या नागरिकांनी धाव घेत येथे गर्दी करत मोबाईलवर शूटिंग, फोटो काढण्यास सुरुवात केली. 

याचवेळी शहाड परिसरात राहणारा इरफान सुलेमानी या धाडसी तरुणाने नाल्यात उतरून या तरुणाला बाहेर काढले. मात्र त्याचा मृत्यू झाला होता. या तरुणाच्या डोक्याला मार लागला होता. या मृत तरुणाची ओळख पटलेली नसून, या मृत तरुणाच्या सोबत असलेला तरुण पळून का गेला? याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. घटनेपाठीमागच्या कारणाचा शोध पोलीस घेत आहेत.

Tags : Mumbai, His was dieing, photos were drawing, Mumbai news,