Mon, Jul 15, 2019 23:42होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबईच्या पुरातून हिंदमाताला मिळणार मुक्‍ती

मुंबईच्या पुरातून हिंदमाताला मिळणार मुक्‍ती

Published On: Feb 11 2018 2:36AM | Last Updated: Feb 11 2018 2:35AMमुंबई : राजेश सावंत 

पावसाळा म्हटला की हिंदमाता सिनेमा परिसरात पाणी तुंबून जनजीवन विस्कळीत झाले नाही, असा एकही दिवस सापडणार नाही. त्यामुळे पालिकेने हिंदमाता भागाकडे आपले लक्ष केंद्रित केले आहे. यासाठी येथे पर्जन्य जलवाहिनीसह बंदिस्त नाल्याचे बांधकाम करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे हिंदमाता पूरप्रवण क्षेत्रातून मुक्त होणार असल्याचा दावा पालिकेकडून केला जात आहे. 

मुंबईत 25 मिमी इतका पाऊस पडला की, पाणी तुंबलेच समजा. हिंदमाता, मिलन सबवे आदी भागात तर, छोट्याशा पावसातही पाणी तुंबते. 2017 मध्ये ऑगस्ट महिन्यात मुसळधार पाऊस पडला होता. त्यामुळे संपूर्ण मुंबईचे जनजीवन विस्कळीत झाले होते. या घटनेनंतर पालिकेने शहरात जेथे जेथे पाणी तुंबते त्या भागाचा अभ्यास करून, 146 पूरप्रवण जागा निश्‍चित करण्यात आल्या. या जागांवर तुंबणार्‍या पाण्यापासून मुंबईकरांना दिलासा देण्यासाठी पर्जन्य जलवाहिन्यांसह बंदिस्त नाले बांधण्यात येणार आहेत. 2018 च्या पावसाळ्यापूर्वी 55 पूरप्रवण ठिकाणी पूरस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी 53 कोटी 71 लाख रुपये खर्च करण्यात येणार आहेत. 

या पूरप्रवण क्षेत्रापैकी हिंदमाता पूरप्रवण क्षेत्राकडे विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. यासाठी देवरूखकर मार्ग ते मडकेबुवा चौकापर्यंत बंदिस्त नाल्याचे बांधकाम आणि लालबाग पोलीस चौकीपासून श्रावण यशवंते चौकापर्यंत 1800 मिमी व्यासाच्या पर्जन्य जलवाहिन्यांचे बांधकाम मायक्रोटनेलिंग पद्धतीने करण्यात येणार आहे. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात या ठिकाणी तुंबणार्‍या पाण्याचा त्वरित निचरा होण्यास मदत होईल, असे पालिकेच्या पर्जन्य जलवाहिनी विभागाकडून सांगण्यात आले. दरम्यान खार चमडावाला नाल्याच्या रुंदीकरणाचे काम हाती घेण्यात येणार असल्यामुळे या भागातील निर्मलनगर, जयभारत सोसायटी व रेल्वे वसाहतीत राहणार्‍या नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.