मुंबई : प्रतिनिधी
अतिरिक्त पोलीस आयुक्त हिमांशू रॉय यांनी केलेल्या आत्महत्येमागे कर्करोग हे कारण असले तरी अन्य काही कारणामुळे त्यांनी आत्महत्या केली असावी का, याचाही आता पोलीस तपास करीत आहेत. त्यांच्या पत्नीची अद्याप जबानी नोंदविण्यात आली नाही. त्यामुळे या आत्महत्येबाबत संभ्रमाचे वातावरण आहे.
हिमांशू रॉय हे त्यांची पत्नी भावना रॉय यांच्यासोबत नरिमन पॉइर्ंट येथील सुचिता अपार्टमेंटच्या चवथ्या मजल्यावर राहत होते. त्यांना हाडाचा कॅन्सर होता. त्यावर उपचारही सुरु होते. नियमित औषधोपचाराने त्यांनी कॅन्सरवर बर्यापैकी मात केली होती. काही दिवसांपूर्वी त्यांनी त्यांच्या मित्रांशी आणि नातेवाईकांशी बोलताना याबाबत उल्लेख केला होता.
शुक्रवारी ते नेहमीप्रमाणे आपल्या कामात व्यस्त होते. त्यांच्या मनात आत्महत्येचा विचार आहे, असे त्यांच्या पत्नी भावना यांनाही वाटले नाही. मात्र दुपारी बेडरुममधून अचानक गोळी झाडल्याचा आवाज आला आणि त्यांनी बेडरुमच्या दिशेने धाव घेतली होती. यावेळी खुर्चीवर बसलेल्या हिमांशू रॉय यांनी तोंडात सर्व्हिस रिव्हॉल्व्हरमधून गोळी झाडून आत्महत्या केल्याचे पाहताच त्यांना मानसिक धक्का बसला. तिथे उपस्थित पोलिसांच्या मदतीने त्यांना तातडीने बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल केले, मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. हिमांशू रॉय यांना डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. त्यांच्या आत्महत्येने सर्वत्र हळहळ व्यक्त होत असताना त्यांचे कुटुंबीय अद्याप या धक्क्यातून सावरलेले नाही.