Mon, Apr 22, 2019 03:45होमपेज › Mumbai-Thane-Raigad › हिमांशू रॉय यांची आत्महत्याच

हिमांशू रॉय यांची आत्महत्याच

Published On: May 14 2018 1:54AM | Last Updated: May 14 2018 1:08AMमुंबई : पुढारी वृत्तसेवा

अतिरिक्‍त पोलीस महासंचालक हिमांशू रॉय यांच्या आत्महत्त्येनंतर मुंबई पोलिसांनी त्यांचे दोन नोकर आणि एका ऑर्डर्लीचे जबाब नोंदवून घेतले. या तिघांनीच रॉय यांना रुग्णालयात दाखल केले होते. प्राथमिक चौकशीत घातपाताची शक्यता नसल्याचे निष्पन्‍न झाले आहे, असे सूत्रांनी स्पष्ट केले. पोलिसांनी आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली आहे. तपासाचा एक भाग म्हणून घटनास्थळी जे लोक उपस्थित होते, त्यांचे जबाब नोंदवून घेतले जात आहेत, असेही सूत्रांनी सांगितले. ही आत्महत्त्याचा होती, असा फॉरेन्सिक रिपोर्ट आल्यास आकस्मिक मृत्यूची नोंद प्राथमिक माहिती अहवालात बदलली जाणार नाही, असे वरिष्ठ आयपीएस अधिकार्‍याने स्पष्ट केले. 

हिमांशू रॉय लिक्‍विड डाएटवर होते. शुक्रवारी सकाळी 10.30 वाजता त्यांनी आपल्या कुटुंबातील इतर सदस्यांबरोबर सकाळचा नाश्ता केला होता. त्यानंतर ते आपल्या टीव्हीरुममध्ये गेले. गुरुवारी ते व्यायामशाळेत गेले होते, तसेच मित्रांच्या गाठीभेटीही घेतल्या होत्या. शुक्रवारी त्यांच्या घरात काही नातेवाईक उपस्थित होते. त्यात 17 वषार्ंची एक मुलगी आणि 15 वर्षांचा मुलगा यांचा समावेश होता.

दुपारच्या जेवणासाठी रॉय यांच्या पत्नी भावना त्यांची वाट पाहत होत्या. तेवढ्यात गोळी झाडल्याचा आवाज येताच कुटुंबातील इतर सदस्यांनी मुलांकडे धाव घेतली. दोन्ही मुले सुरक्षित असल्याची खात्री पटल्यानंतर भावना यांनी रॉय यांच्या रुमचा दरवाजा उघडला. रॉय यांना रक्‍ताच्या थारोळ्यात पडलेले पाहताच त्यांनी आरडाओरड केली. त्यानंतर रॉय यांना बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आणि दुपारी 1.47 मिनिटांनी त्यांना उपचारापूर्वीच मृत घोषित करण्यात आले. रॉय यांनी आत्महत्त्येच्या दिवशी आपली नेहमीची दिनचर्या पार पाडली होती. ते रात्री उशिराच आपल्या रुममध्ये एकटे राहणे पसंत करीत असत. शुक्रवारी सकाळी त्यांनी आपल्या पत्नी भावना आणि आपल्या पाहुण्यांसोबत न्याहारी घेतली होती.

काही वेळ टीव्ही पाहिल्यानंतर ते आपल्या खोलीत गेले होते. मधल्या काळात त्यांनी दुपारचे जेवण तयार ठेवण्याची सूचना आपल्या आचार्‍याला केली होती, असे तपासात निष्पन्‍न झाले होते. रॉय यांच्या खोलीत सुसाईड नोट सापडली असून, गंभीर आजारामुळेच मी आत्महत्त्या करीत आहे, आणि त्यासाठी मी जबाबदार आहे, असे त्यांनी त्यात नमूद केले आहे. शेवटी गॉड ब्लेस असा उल्‍लेख करुन त्यांनी स्वाक्षरी केली आहे. ज्या सर्व्हिस रिव्हॉल्व्हरने रॉय यांनी आत्महत्त्या केली त्याची कागदपत्र सुसाईड नोट ठेवलेल्या टेबलवरच होती, असे एका अधिकार्‍याने सांगितले.