Tue, Jun 02, 2020 11:19होमपेज › Mumbai-Thane-Raigad › हिमालय पूल  दुर्घटनेचा अहवाल आयुक्तांना सादर?

हिमालय पूल  दुर्घटनेचा अहवाल आयुक्तांना सादर?

Published On: May 16 2019 2:08AM | Last Updated: May 16 2019 2:02AM
मुंबई : प्रतिनिधी 

हिमालय पूल दुर्घटनेचा चौकशी अहवाल बुधवारी महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांना सादर करण्यात आल्याची चर्चा आहे. या अहवालात कारवाईसाठी नव्याने कुणाही अधिका-यांचे नाव नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान या दुर्घटनेप्रकरणी आणखी सखोल चौकशी केली जाणार असून ते काम उपायुक्त विश्‍वास शंकरवार यांना देण्यात येणार असल्याचे सांगितले जाते आहे.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील हिमालय पादचारी पूल 14 मार्च रोजी कोसळून झालेल्या दुर्घटनेत सात जण ठार तर, 36 प्रवासी जखमी झाले आहेत. दुर्घटनेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या आदेशानुसार प्राथमिक चौकशी करण्यात आली होती. त्यात स्ट्रक्चरल ऑडिटर डी. डी. देसाई कंपनीचा नीरज देसाई, पालिकेचे सहाय्यक अभियंते एस. एफ. काकुळते, कार्यकारी अभियंता ए.आर.पाटील व गेल्या आठवड्यातच निवृत्त मुख्य अभियंते शितलाप्रसाद कोरी यांना अटक करण्यात आली. 

चौकशीचा पहिल्या टप्प्यातील अहवाल बुधवारी चौकशी समितीने आयुक्तांना सादर केला आहे. आयुक्तांनी अद्याप हा अहवाल पाहिलेला नाही. गुरूवारी अहवाल पाहून कारवाई व मुंबईतील सर्वच पुलांबाबत सावधगिरीची आणखी शिफारस करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

काय असू शकते अहवालात

 पूल मॅन्युअलनुसार दर तीन महिन्यांनी पुलाची तपासणी व्हायला हवी ती हिमालयबाबत झाली नाही.
 पुलाच्या लोखंडी रॉडना गंज चढला होता. लाद्यांची दुरवस्था झाली होती.
 स्ट्रक्चरल ऑडिटर व पूल विभागातील अधिका-यांनी अक्षम्य दुर्लक्ष केले.
  ए विभागाने केलेल्या दुरूस्तीत पुलाचे बांधकाम किती मजबूत आहे याच्या पाहणीबाबत संभ्रमता
  मध्य रेल्वेने बाहेरगावी जाणा-या गाड्यांसाठी बांधलेला नवीन पूल हिमालयला जोडण्यात आल्याने त्यावरचा प्रवासी ताण मोठ्या प्रमाणात वाढला.