Thu, Apr 25, 2019 03:59होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबई पोलिसात पोस्टिंगसाठी अधिकार्‍यांची 'सेटिंग'

मुंबई पोलिसात पोस्टिंगसाठी अधिकार्‍यांची 'सेटिंग'

Published On: Jan 14 2018 1:53AM | Last Updated: Jan 14 2018 12:54PM

बुकमार्क करा
मुंबई : अवधूत खराडे

राज्य पोलीस दलामध्ये कार्यरत असलेल्या काही उच्चपदस्थ अधिकार्‍यांचा बढत्यांसोबतच पोस्टिंगवरील कार्यकाल पूर्ण झाला असल्याने नव्या नियुक्त्यांसाठी अधिकार्‍यांनी मोठी फिल्डिंग लावली आहे. येत्या काही दिवसांतच नव्या नियुक्त्या करण्यात येणार असून शासनाची मर्जी प्राप्त करू शकलेल्या अधिकार्‍यांना क्रीम पोस्टिंग मिळणार आहे. आघाडी सरकारमधील मंत्र्यांच्या नावे जोडली गेलेल्या अधिकार्‍यांना साईड पोस्टिंगला जावे लागणार असल्याची माहिती खात्रीलायक सुत्रांकडून मिळते.

मुंबई पोलीस दलामध्ये चांगल्या पोस्टिंगसाठी अनेकांनी फिल्डिंग लावली असल्याने मुंबईसह याचा परिणाम ठाणे, नवी मुंबई, पुणे पोलीस दलातील अधिकार्‍यांच्या बदल्यांवर होणार आहे. राज्य पोलीस दलातील महत्त्वाचे आणि नियमानुसार दुसर्‍या क्रमांकाचे पोस्टिंग असलेले लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी) प्रमुखाचे पद गेल्या अनेक महिन्यांपासून रिक्त ठेवण्यात आले आहे. असे असतानाही मुंबईच्या आयुक्तांना बदलण्याचा शासनाचा मानस नसून ते थेट पोलीस महासंचालकांच्या निवृत्तीनंतर त्यांच्या जागीच नवीन पदभार स्वीकारणार असल्याचे बोलले जाते. राज्याचे पोलीस महासंचालक सतीश माथुर जून महिन्यात, तर मुंबईचे पोलीस आयुक्त असलेले दत्ता पडसळगीकर हे ऑगस्ट महिन्यात निवृत्त होणार आहेत.

अधिकार्‍यांच्या बढत्या आणि बदल्यांमुळे रिक्त होणार्‍या जागांवर वर्णी लावण्यासाठी आपले राजकीय संबंध वापरत अनेकांनी सेटिंग लावली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागातील अधिकार्‍याने पुणे पोलीस आयुक्तालयासाठी प्रयत्न सुरू केले असल्याने पुणे पोलीस दलातील उच्चपदस्थ अधिकार्‍याची त्याच्या मागणीवरून महामार्ग विभागात बदली होणार असल्याचे बोलले जाते. तर बढत्या घेऊन ठाण्यासह राज्यात अन्य ठिकाणी नियुक्त झालेल्या अधिकार्‍यांनी पुन्हा मुंबईत परतून येथील महत्त्वांच्या रिक्त होणार्‍या जागांवर आपला दावा केला आहे. रेल्वे पोलीस आयुक्तालय आणि मुंबई आयुक्तालयातील उच्चपदस्थ अधिकार्‍यांमध्ये पदांचे फेरबदल होणार असल्याचेही संकेत मिळाले आहेत.

शासनाच्या मर्जीतील काही अधिकार्‍यांना आणखी काही काळ थांबा अशा सूचना देण्यात आल्या असून आघाडी सरकारच्या काळात क्रीम पोस्टिंग घेतलेल्या म्हणजेच त्या मंत्र्यांचा शिक्का बसलेल्या अधिकार्‍यांना मात्र मुंबईबाहेरच जावे किंवा साईड पोस्टिंगला रहावे लागणार आहे. तर मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका लक्षात घेत, शहरात जास्तीत जास्त मराठी अधिकार्‍यांना महत्त्वाच्या पोस्टिंग देण्याचा मानस शासनाचा असल्याचीही माहिती खात्रीलायक सुत्रांकडून मिळते. तर आपल्याला हीच पोस्टिंग मिळणार असा दावा करत देव पाण्यात बुडवून ठेवलेल्यांचा हिरमूड होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.