Fri, Feb 22, 2019 19:46होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ठाण्यात हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

ठाण्यात हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

Published On: Feb 11 2018 2:35AM | Last Updated: Feb 11 2018 2:23AMठाणे : प्रतिनिधी 

ठाण्याच्या वागळे इस्टेट परिसरातील एका हॉटेलमध्ये हाय प्रोफाइल सेक्स रॅकेट सुरु असल्याची माहिती मिळताच ठाणे पोलिसांच्या अनैतिक मानवी तस्करी विरोधी पथकाने सदर ठिकाणी शुक्रवारी छापा मारून या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला. यावेळी एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीसह अन्य एका तरुणीची सुटका करण्यात आली. याप्रकरणी एका दलाल महिलेस अटक करण्यात आली.

वागळे इस्टेट, रोड क्रमांक 16 येथील हॉटेल द्वारका येथे अनैतिक व्यवसाय सुरु असल्याची माहिती ठाणे अनैतिक मानवी तस्करी विरोधी पथकास मिळाली होती.या माहितीच्या अनुषंगाने पथकाने या हॉटेलवर शुक्रवारी दुपारी 3.30 च्या सुमारास छापा मारला. यावेळी हॉटेलमध्ये दोन तरुणींकडून त्यांच्या आर्थिक परिस्थितीचा फायदा घेऊन त्यांना शरीरविक्रेय करण्यास भाग पाडण्यात येत असल्याचे आढळून आले. या दोन पीडित तरुणींची सुटका करण्यात आली असून त्यात एका अल्पवयीन 16 वर्षाच्या मुलीचा समावेश आहे. 

हा व्यवसाय चालवणार्‍या पूजा राजेश जैतापकर (26, राहणार -मीरारोड) या महिला दलालास अटक करण्यात आली आहे. ही दलाल महिला काही ग्राहकांशी फोनवरून संपर्क साधत त्यांना हाय प्रोफाईल मुली शरीरसंबंधासाठी पुरवत असे. तसेच ज्या सुसज्ज हॉटेलमध्ये हा सारा प्रकार सुरू होता ते हॉटेल फॅमिली रेस्टॉरंटच्या नावाने सुरु असल्याने कुणास या गैरप्रकाराचा संशयही येत नव्हता. 

याप्रकरणी वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण व अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती अनैतिक मानवी तस्करी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र दौंडकर यांनी दिली.