Wed, Jul 17, 2019 18:07होमपेज › Mumbai-Thane-Raigad › उच्चशिक्षित तरुणींना ठकसेनाचा गंडा!

उच्चशिक्षित तरुणींना ठकसेनाचा गंडा!

Published On: Aug 14 2018 1:35AM | Last Updated: Aug 14 2018 1:23AMकल्याण : वार्ताहर

विवाह नोंदणी संस्थांच्या संकेतस्थळावरून उच्चशिक्षित तरुणींची माहिती मिळवत त्यांना गंडा घालणार्‍या भामट्याला कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांनी गजाआड केले आहे. शुभांकर बॅनर्जी असे या भामट्याचे नाव आहे. गुगलमध्ये इथिकल हॅकर व एटीएससाठी हॅकरचे काम करत असल्याचे भासवून शुभंकर हा तरुणींशी मैत्री करत त्यांना लग्नाचे आमिष दाखवत होता. तसेच या तरुणींकडून विविध बहाण्याने लाखो रुपये उकळायचा. त्याने आजमितीला अनेक तरुणींना फसवल्याची माहिती पोलिसांनी दिली. 

काही दिवसांपूर्वी महात्मा फुले पोलीस ठाण्यात लग्नाचे आमिष तसेच वडील आजारी असल्याचा बहाणा देत एका तरुणीकडून बेंगलोर येथे राहणार्‍या शुभंकरने तब्बल 6 लाख 86 हजार रुपये उकळल्याची घटना कल्याणमध्ये उघडकीस आली होती. तसेच शुभांकरने या तरुणीला हॉटेलमध्ये नेत तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न केला व हॉटेलमधील भेटीचे फोटो व्हायरल करत बदनामी करण्याची धमकी देखील दिली होती. अखेर या जाचाला कंटाळून या पीडित तरुणीने याप्रकरणी महात्मा फुले पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली होती. या तक्रारीनुसार पोलिसांनी गुन्हा दखल करत पुढील तपास सुरू केला होता. त्यानंतर पोलिसांनी बेंगळुरूमध्ये सापळा रचत शुभांकरला अटक केली. 

त्याने अशाप्रकारे आजमितीला तब्बल 25 मुलींना फसवले असून आतापर्यंत फसवणूक झालेल्या तीन पीडित मुली समोर आल्या आहेत. या मुलींकडून त्याने एकूण 37 लाख रुपये उकळले आहेत. शुभांकर याने अनेक मुलींची फसवणूक केल्याचे समोर आल्याने ज्या-ज्या मुलींना फसवले आहे, त्या पीडित मुलींनी महात्मा फुले पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.