Wed, Jul 17, 2019 08:36होमपेज › Mumbai-Thane-Raigad › घरभाडे देणे जमत नसेल तर एकरकमी पैसे द्या : हायकोर्ट

घरभाडे देणे जमत नसेल तर एकरकमी पैसे द्या : हायकोर्ट

Published On: Jul 08 2018 1:44AM | Last Updated: Jul 08 2018 1:37AMमुंबई : प्रतिनिधी

शहर आणि उपनगरांना पाणी पुरवठा करणार्‍या तानसा  मुख्य जलवाहिन्यांच्या जवळील झोपड्या हटवून त्यांचे पुनर्वसन करण्यास असमर्थ  ठरलेल्या राज्य सरकारला उच्च न्यायालयाने चांगलेच धारेवर धरले. या लोकांचे पुनर्वसन करण्यासाठी जागा शोधता येत नसेल, पर्यायी घरे देण्यास असमर्थ असाल तर त्यांना घरभाडे द्या. तेही जमत नसेल तर त्यांना त्यांच्या मोबदल्याचे एक रकमी पैसे द्या,अशा शब्दांत न्यायमूर्ती अभय ओक आणि रियाध छागला यांनी सरकारचे कान उपटले. एका आठवड्यात याचा काय तो निर्णय घ्या असेही न्यायालयाने बजावले.

उच्च न्यायालयाने शहर आणि उपनगरांना पाणी पुरवठा करणार्‍या मुख्य जलवाहिन्यांच्या जवळ उभारलेल्या बेकायदा झोपड्या  हटविण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार दुसर्‍या टप्प्यातील या झोपड्या हटविण्यासाठी न्यायालयाने महापालिकेला 31 डिसेंबरची डेडलाईन दिली आहे. ही डेडलाईन  जवळ आल्याने पालिकेने सरसकट सर्वच झोपड्यांना नोटीसा बजावून कारवाईला सुरूवात केल्यानंतर रहिवाशांनी उच्च न्यायालयात धाव घेऊन याचिका दाखल केल्या आहेत. त्या याचिकांवर न्यायमूर्ती अभय ओक आणि न्यायमूर्ती  रियाध  छागला  यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. 

स्थलांतराच्या नावाखाली  प्रकल्पग्रस्तांना जबरदस्तीने माहुल येथे  जाण्याची सक्ती केली जात होती. त्याला प्रकल्पग्रस्तांचा जोरदार विरोध असल्याने  न्यायालयाने राज्य सरकारला त्यांच्यासाठी नवी जागा शोधण्याचे आदेश दिले होते. त्यातही  सरकारला अपयश आल्याने  घरे देईपर्यंत घरभाडे द्या असे निर्देश दिले होते. 

मात्र, प्रकल्पग्रस्तांना घरभाडे निश्‍चित करण्याचे  राज्य सरकारचे कोणतेही धोरण नसल्याचे एसआरएने प्रतिज्ञपत्र सादर करून न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. तसेच  झोपडपट्टी पुनर्विकास योजनेअंतर्गत विकासक आणि झोपडपट्टीधारकांमध्ये  घरभाड्या संदर्भात सामंजस्याचा करार करून ते ठरविले जाते.  परंतु त्यांच्यात वाद निर्माण झाला तर किती भाडे द्यावे याची तरतूद नसल्याचे स्पष्ट केले. तुम्हाला काहीच करता येत नसेल तर त्यांना एकरकमी पैसे द्या, त्या बाबत निर्णय घ्या, असे निर्देश देऊन याचिकेची पुढील सुनावणी एक आठवडा तहकूब ठेवली.