Thu, Apr 25, 2019 15:25होमपेज › Mumbai-Thane-Raigad › 5 रुपयांचे पॉपकॉर्न 250 रुपयांना कसे?

5 रुपयांचे पॉपकॉर्न 250 रुपयांना कसे?

Published On: Jun 28 2018 1:33AM | Last Updated: Jun 28 2018 1:23AMमुंबई : प्रतिनिधी

पाच रुपयाला मिळणार्‍या पॉपकॉर्नचे पॅकेट मल्टिप्लेक्स थिएटरमध्ये दोनशे पन्नास रुपयांना कसे काय विकले जाते, हे विकण्याचा अधिकार त्यांना कोणी बहाल केला, असे सवाल उपस्थित करून उच्च न्यायालयाने राज्य सरकारला बुधवारी चांगलेच धारेवर घेतले. अशा पध्दतीने चढ्या किमतीत खाद्यपदार्थांची विक्री करणार्‍यांवर कारवाई करण्याची कायद्यात तरतूद आहे काय, अशी विचारणा करून राज्य सरकारला चार आठवड्यांत माहिती देण्याचे निर्देश दिले आहेत.

थिएटर्समध्ये बाहेरील खाद्यपदार्थ वा पाणी आणण्यास मनाई करण्याची कायद्यात कुठेही तरतूद नाही, असा दावा करत शहरातील रहिवासी जैनेंद्र बक्षी यांच्यावतीने अ‍ॅड.आदित्य प्रताप यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. त्या याचिकेवर न्यायमूर्ती रणजित मोरे आणि न्यायमूर्ती अनुजा प्रभुदेसाई यांच्या खंडपीठासमोर बुधवारी सुनावणी झाली.

यावेळी याचिकाकर्त्यांच्या वतीने अ‍ॅड. आदित्य प्रताप यांनी मल्टिप्लेक्स थिएटरमध्ये एखाद्या व्यक्तीला तब्येतीच्या कारणामुळे बाहेरचे अन्न खाण्याचे बंधन असतानाही त्याला घरचे पदार्थही नेण्यास मनाई केल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. यावेळी मल्टिप्लेक्सच्या संघटनेने हस्तक्षेप केला. आम्ही कुणावरही मल्टिप्लेक्समध्ये खाद्यपदार्थ विकत घेण्यासाठी सक्ती करत नाही. हा वरून :ज्याच्या-त्याच्या इच्छेचा प्रश्‍न आहे. आरामदायी सोयीसुविधा पुरवणे हे आमचे काम आहे, त्या घेणे न घेणे याचा निर्णय लोकांनी घ्यावा, अशी भुमिका घेतली. याची गंभर दखल न्यायालयाने घेतली.

मुंबईसह राज्यभरातील मल्टीप्लेक्स थिएटरमध्ये विकले जाणारे अन्नपदार्थ अव्वाच्यासव्वा किंमतीत का विकले जातात, असा सवाल न्यायालयाने केला. लोकांना त्यांच्या घरचे अन्नपदार्थ मल्टीप्लेक्समध्ये आणू जाऊ दिले जात नाहीत तर मग तिकडे खाजगी व्यावसायिकांना अन्नपदार्थ विकण्याची परवानगी कशी दिली जाते, अशी विचारणा राज्य सरकारकडे करून अशा पध्दतीने भरमसाठ किंमतीमध्ये खाद्यपदार्थाची विक्री करणार्‍या मल्टिप्लेक्स थिएटर मालकांविरोधात मुंबई पोलीस कायद्याअंतर्गत कारवाई होऊ शकते का, अशी विचारणा राज्य सरकारकडे  करून त्या संदर्भातील माहिती चार आठवड्यात सादर करा, असे निर्देशही दिले.