Mon, May 20, 2019 08:01होमपेज › Mumbai-Thane-Raigad › हायकोर्टाने वाहतूक विभागाला फटकारले

हायकोर्टाने वाहतूक विभागाला फटकारले

Published On: Feb 15 2018 1:57AM | Last Updated: Feb 15 2018 1:26AMमुंबई : प्रतिनिधी   

वाहतूक पोलिसांच्या भ्रष्टाचाराचा पर्दाफाश करणारे फोटो आणि व्हिडिओसह तक्रार दाखल होत असेल तर त्याची चौकशी कसली करता ? अशा वाहतूक पोलिसावर थेट कारवाईचा बडगा उगारा अशा शब्दात उच्च न्यायालयाने बुधवारी संताप व्यक्‍त केला. वाहतूक पोलीस खात्यातील भ्रष्टाचाराविरोधात दाखल करण्यात आलेल्या जनहीत याचिकेच्या सुनावणीच्यावेळी मुंबई शहरातील वाहतूक समस्येवर न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या खंडपीठाने वाहतूक पोलीस विभागाला चांगलेच फैलावर घेतले. 

पोलिसांविरोधात थेट तक्रारी नोंदविण्यासाठी पोलिसांच्या आयुक्तपदांवरील अधिकार्‍यांचे मोबाईल नंबर सार्वजनिक करा, म्हणजे बड्या अधिकार्‍यांनाही कळेल की, सर्वसामान्य नागरिकांच्या नेमक्या काय समस्या आहेत, असेही न्यायालयाने राज्य सरकारला सुनावले.

हेड काँस्टेबल सुनील काटे यांच्या वतीने अ‍ॅड. दत्ता माने यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल करून कोट्यवधी रुपयांच्या भ्रष्टाचारात बरबटलेल्या भ्रष्ट अधिकार्‍यांची खातेअंतर्गत चौकशी करून त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल करा, अशी मागणी केली. बर्‍याच वेळा वाहतूक पोलीस कर्तव्यावर असताना काम सोडून झाडाखाली उभे रहातात आणि मोबाईलवर बोलत असतात. किंवा काही गेम खेळण्यात मग्न असतात. त्यामुळेच मुंबईच्या वाहतुकीचा बोजबारा उडतो. मात्र त्याकडे त्यांचे लक्ष नसते,अशा शब्दात संताप व्यक्त केला.