Thu, Jun 27, 2019 15:44होमपेज › Mumbai-Thane-Raigad › दाभोलकर, पानसरे हत्या प्रकरण: आम्ही हात टेकले- CBI

दाभोलकर, पानसरे हत्या प्रकरण: आम्ही हात टेकले- CBI

Published On: Apr 20 2018 1:25AM | Last Updated: Apr 20 2018 1:25AMमुंबई : प्रतिनिधी

डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींना 15 ते 20 वर्षांनंतर म्हातारे झाल्यावर पकडणार का, असा संतप्‍त सवाल करीत मुंबई उच्च न्यायालयाने याप्रकरणी तपास यंत्रणांना फटकारले आहे. या प्रकरणांचा तपास करताना आम्ही हात टेकले, अशी स्पष्ट कबुलीच तपास यंत्रणांनी गुरुवारी न्यायालयात दिली. हत्येचा तपास अशा टप्प्यावर आला आहे की, त्यापुढे तपासाची कोणतीच दिशा आम्हाला सापडत नाही, असे अखेर सीबीआय आणि एसआयटी या दोन्ही तपास यंत्रणांनी मुंबई उच्च न्यायालयात मान्य केले.

तपास यंत्रणांच्या या भूमिकेवर न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या खंडपीठाने तीव्र नाराजी व्यक्‍त करून यापुढे आता गुन्हेगारांना कधीच पकडू शकणार नाही का, असा संतप्त सवाल उपस्थित केला.

शरण आलेले आरोपी आपण पकडणार का, असा सवालही न्यायालयाने केला. यापुढे फिल्डवर्क करून काही होईल अशी आशा नाही, जो काही तपास आहे तो शास्त्रीय पद्धतीने संशोधन करून आणि पुरावे मिळवूनच होऊ शकेल, असे मत व्यक्‍त करून न्यायालयाने तसे निर्देश सीबीआय आणि एसआयटीला देत याचिकेची सुनावणी 28 जूनपर्यंत तहकूब ठेवली.

पानसरे आणि दाभोलकर यांच्या हत्याकांडाची स्वतंत्र यंत्रणांमार्फत चौकशी व्हावी, अशी मागणी करणार्‍या विविध याचिका उच्च न्यायालयात दाखल आहेत, या याचिकांवर सुनावणी झाली.

वाढत्या गुन्हेगारीमुळे देशाची प्रतिमा मलिन

बलात्कार आणि वाढत्या गुन्हेगारीमुळे देशाची प्रतिमा मलिन होत आहे. भारताची आंतरराष्ट्रीय स्तरावर बदनामी होते. या देशात  फक्‍त गुन्हेच घडत आहेत, आरोपींना पकडण्यात अपयश येत आहे. देशात कुणीच सुरक्षित नाही, असा सर्वांचा समज झाला आहे. ज्या देशात विचारवंत, कलाकार यांना आंतरराष्ट्रीय व्यासपीठ मिळाले नसेल, तर देशाचा विकास कसा होणार? भारताची प्रतिमा आज अशी झाली आहे की, कोणत्याही उदारमतवादी व्यक्‍तीला इकडे सुरक्षित वाटत नाही, अशी खंतही न्यायालयाने व्यक्‍त केली.