Fri, Apr 26, 2019 09:47होमपेज › Mumbai-Thane-Raigad › नवघर मिठागरात दिडशे जण अडकले

नवघर मिठागरात दिडशे जण अडकले

Published On: Jul 10 2018 1:03AM | Last Updated: Jul 10 2018 1:03AMवसई : प्रतिनिधी

पालघर जिल्ह्यात पावसाचा हाहाकार सुरूच असून सोमवारीही त्याचे तांडव सुरूच होते. दरम्यान नवघर येथील मिठागरात सुमारे 400 कर्मचारी अडकून पडले होते. त्यापैकी 250 कामगारांना होडीच्या सहाय्याने बाहेर काढण्यात आले आहे. अडकलेल्या कामगारांना बाहेर काढण्यासाठी विशेष पथकच तैनात करण्यात आले आहे. वसई ग्रामीण व शहरी भागातही पाणी साचले आहे. पावसाचा सर्वाधिक फटका वसई, विरार, नालासोपारा या शहरी भागांसह पालघर तालुक्याला बसला. या प्रलयंकारी पावसाने 26 जुलैच्या महापुराची जिल्हावासीयांना आठवण झाली.

पावसाने रविवारी मध्यरात्री पुन्हा रौद्ररूप धारण केले. रात्रभर चांगला पाऊस झाल्याने वसई, विरार, नालासोपारा शहरातील अनेक रस्ते पाण्याखाली जाऊन वाहतूक ठप्प झाली. नालसोपारा, वसई, सफाळे परिसरात रेल्वेमार्गावर पाणी साचल्यामुळे विरार-डहाणू उपनगरीय सेवा बंद पडली. विरार शहरातील बोळींज, गोकुळ टाऊनशिप, मनवेलपाडा, चंदनसार, नालासोपारा शहरातील तुळींज, आचोळे, विवा महाविद्यालय परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचले. बोळींज भागातील दिवलईपाडा येथील अनेक आदिवासी बांधवांच्या घरांत पाणी घुसले.

अजमेरनगर टेकडीचा भाग कोसळला

भिवंडी येथे नारपोली पोलीस ठाण्यामागे अजमेरनगर येथे टेकडीचा भाग कोसळला असल्याने 26 कुटुंबांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे.