Wed, Apr 01, 2020 23:44होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मालमत्ता करासाठी हेलिकॉप्टर जप्त

मालमत्ता करासाठी हेलिकॉप्टर जप्त

Last Updated: Feb 26 2020 1:52AM
मुंबई : पुढारी वृत्तसेवा

मालमत्ता कर भरण्यास मुंबईकरांकडून फारसा प्रतिसाद मिळत नसल्यामुळे कराडो रुपयाचा कर वसूल करणे शक्य झाले नाही. नोटीस पाठवूनही दाद दिली जात नसल्यामुळे पालिकेने मोठ्या ग्राहकांची मालमत्ता जप्त करण्यास सुरूवात केली आहे. मंगळवारी मेस्को एअरलाईन्स कंपनीने मालमत्ता कर थकवल्यामुळे त्यांची दोन हेलिकॉप्टर  पालिकेच्या भरारी पथकाने जप्त केली. त्यामुळे थकबाकीधारकांची झोप उडाली आहे.

पालिकेच्या उत्पन्नाचे मुख्य स्त्रोत जकात बंद झाल्यामुळे येणार्‍या काळात पालिकेला मालमत्ता करातून मिळणार्‍या उत्पन्नावर अवलंबून रहावे लागणार आहे. पण मालमत्ता कर भरण्यास मुंबईकर स्वत:हून पुढे येत नाहीत. त्यामुळे कर वसूली रखडली आहे. यावर्षी 5 हजार कोटी रुपयाहून जास्त कर वसूलीचे लक्ष ठेवण्यात आले होते. पण यापैकी 40 टक्के कर वसूल झाला नाही. त्यामुळे पालिकेने वेळेत कर भरणार्‍या ग्राहकांसाठी 2 ते 5 टक्के सवलत देण्याची योजना अंमलात आणली. पण या योजनेलाही फारसा प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुले पालिकेने कर वेळेत भरण्यासाठी जाहिरातद्वारे मुंबईकरांना आवाहन केले. एवढेच नाही तर, शहरात फिरून ढोल वाजवत मालमत्ता कर भरण्याची आठवण करून देण्यात येत आहे. पण याकडेही मुंबईकरांनी दुर्लक्ष केल्यामुळे अखेर पालिकेने मालमत्ता धारकांविरोधात कारवाई करण्यास सुरूवात केली आहेत. 

मालमत्ता करदात्यांची मालमत्ता जप्तीसह दंडात्मक कारवाई सुरू केली आहे. मंगळवारी मेस्को एअरलाईन्स कंपनीची दोन हेलिकॉप्टर जप्त करण्यात आली. या कंपनीने मालमत्ता करापोटी पालिकेचे 1 कोटी 64 लाख 83 हजार 658 रुपये थकवले आहेत. त्यामुळे ही कारवाई करण्यात आल्याचे करनिर्धारण विभागाकडून सांगण्यात आले. 

थकवलेली मालमत्ता रक्कम व दंड भरल्यानंतरच हेलिकॉप्टर सोडण्यात येती, असेही या विभागाकडून सांगण्यात आले. दरम्यान अशीच कारवाई येणार्‍या 31 मार्चपर्यंत करण्यात येणार आहे. यात मोठ्या ग्राहकांची कर वसूली तातडीने करण्यात येणार आहे.