Sat, Jul 04, 2020 15:27होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुसळधार पावसात नेहमीच्या ठिकाणी तुंबली मुंबई

मुसळधार पावसात नेहमीच्या ठिकाणी तुंबली मुंबई

Last Updated: Jun 05 2020 1:16AM
मुंबई : पुढारी वृत्तसेवा

निसर्ग चक्रीवादळाच्या तडाक्यातून बुधवारी वाचलेल्या मुंबईरांना गुरूवारी विजेच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा सामना करावा लागला. हवामान विभागाने दिलेल्या इशार्‍यानुसार गुरूवारी सकाळपासूनच मुंबईत ढगांच्या गडगडाटासह जोरदार पावसाने हजेरी लावली. परिणामी, किंग्ज सर्कलसह काही सखल भागांत पाणी भरल्याचे चित्र पाहायले मिळाले.

निसर्ग चक्रीवादळासह मुसळधार पावसाने बुधवारी मुंबई आणि हवामान विभागाच्या अंदाजालाही चकवा दिला. मुंबईत मुसळधार पाऊस पडला नसला, तरी बुधवारी सुटलेल्या सोसाट्याच्या वार्‍यामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याने मालमत्तेचे नुकसान झाले होते. त्यानंतर हवामान विभागाने गुरूवारसाठी मुंबईला दिलेला जोरदार पावसाचा इशारा अचूक ठरला. 

निसर्गाने महाराष्ट्रातून निरोप घेतला असला, तरी मुंबईसह कोकण किनारपट्टीवर पावसाचे वातावरण निर्माण केले होते. त्यामुळे मुंबईत सकाळपासून ढगाळ वातावरण होते. हवामान खात्याच्या कुलाबा वेधशाळेने सकाळी 45.4 मीमी पावसाची नोंद केली. त्यापाठोपाठ सांताक्रुजमध्ये 32.2, वांद्रेमध्ये 30.9, अंधेरीत 21, वरळीमध्ये 46, दादरमध्ये 42, वडाळ्यामध्ये 59 मीमी पावसाची नोंद केली होती. उपनगरात सकाळपासून चेंबूर, घाटकोपर, कुर्ला, भांडुप, मुलूंड येथे जोरदार पाऊस कोसळला. तर दक्षिण मुंबईत मात्र पावसाच्या सरींचा लपंडाव सुरू होता. दुपारी शहरात पावसाने पूर्णपणे उसंत घेतल्याचे पाहायला मिळाले.

किंग्ज सर्कल येथे पाणी भरल्याने बेस्ट प्रशासनाने या मार्गावरून जाणार्‍या बसेसच्या मार्गांत बदल केला होता. कुर्ला येथील लाल बहाद्दूर शास्त्री मार्गावरही पाणी भरले होते. याउलट अत्यावश्यक सेवेत धावणार्‍या एसटी, बेस्ट बसेस नेहमीप्रमाणे धावताना दिसल्या. आरटीओने केलेल्या आवाहनानुसार, प्रवाशांना रेल्वे स्थानकापर्यंत सोडण्यासाठी आणि स्थानकावरून घरी घेऊन जाणारी टॅक्सी चालकांची सेवा नियमित सुरू ठेवल्याचे संघटनेने सांगितले.

पावसाच्या जोडीला गारवा

मुंबईकरांच्या सेवेत पावसासोबत गुरुवारी गारवाही आली आहे. हवामान खात्याने मंगळवारनंतर सातत्याने बुधवार व गुरूवारी कमाल तापमानात घट नोंदवली आहे. मुंबईत मंगळवारी 35 अंश सेल्सियसवर असलेले कमाल तापमान गुरूवारी 26.4 अंश सेल्सियसपर्यंत घसरले होते. हवामान विभागाने शुक्रवारी मुसळधार व शनिवारी मध्यम स्वरूपाच्या पावसाचा इशारा कायम ठेवलेला आहे. तसेच पावसामुळे शुक्रवारी कमाल तापमान 26 अंशावर घसरून शनिवारी पुन्हा 29 अंशापर्यंत वाढण्याचा अंदाजही व्यक्त केला आहे.